अकोला दिव्य न्यूज : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 126 व्या जयंती उत्सवानिमित्त रविवार 29 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता नेहरू पार्क गोरक्षण रोड येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अकोला भूषणसह समाजवीर व जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या सोहळ्याकरिता जिल्हाधिकारी अजित कुंभार व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरदराव गडाख प्रामुख्याने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा होईल. या कार्यक्रमात डॉ. गजानन नारे यांना अकोला भूषण पुरस्कार देऊन त्यांचा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. नारे यांनी शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही एक भरीव कामगिरी करून संपूर्ण महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सुंदर शाळा योजना अंतर्गत प्रभात किड्स स्कूलने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून शिक्षण क्षेत्रातही अकोला जिल्ह्याचे नाव शिखरावर पोहोचविले आहे. त्यांचे हे कार्य जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मानार्थ त्यांना अकोला भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन आयोजित कार्यक्रमात नागरिक बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक बी.एस.देशमुख व सौ इंदुताई देशमुख यांनी केले आहे.