अकोला दिव्य न्यूज : हिंगोली पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या घरात अचानक गोळीबार केला. गोळीबारात घटनास्थळीच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर मुलगी, सासू व मेव्हाण गंभीर जखमी झाले आहेत.घटनेनंतर आरोपी पोलिस कर्मचारी फरार असून ही घटना बुधवार २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी विलास बळीराम मुकाडे यांचे हिंगोली शहरातील प्रगती नगरात घर आहे. काल बुधवारी रात्रीच्या सुमारास घरी आले असता त्यांनी पत्नीवर गोळी झाडली. त्यानंतर मुलगा, सासू व मेव्हण्यावरही गोळीबार केला. यात पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा, सासू व मेव्हणा जखमी झाले.
जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार करून, पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस निरीक्षक श्यामराव डोंगरे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर विलास मुकाडे हा पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.अद्याप घटनेचे कारण समजू शकले नाही.