अकोला दिव्य : पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्याने वृध्दाश्रममध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार आहे. हे जळजळीत सत्य असून, आपण विवाह संस्थेचा ढाचा आणि पायाच उखडून टाकत आहोत.यात कोणतीही शंका उरली नाही.अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृध्दापकाळाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे. कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्त आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे.
फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही. कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने/संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळेच ! शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीन जुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे. याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे. तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता व निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. तेही आपल्यावर स्वतःहून लादून घेतलेल्या अटीमुळेच !
खरं तर बायोडाटा बघुन किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करुन विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल,याचा विवाहइच्छुक तरुण-तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अट्टाहास हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर पडणारचं आहे. पण सामाजिक संतुलन सुध्दा बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबी मारक ठरत आहेत.
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते. आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत. यावर गंभीरपणे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी वय वाढल्यावर तडजोड करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्यपणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहावयाचे एवढे करुन पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय ? संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल.यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
आज अपेक्षेचे ओझे वाढवून नाहक मुला-मुलींचे वय निघून जात आहे.याची खंत ना मुलांना ना पालकांना. आजचा काळ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहिल,हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहिल हे सुध्दा सांगता येत नाही. पालकांनो आणि मुला-मुलींनो भविष्याचा विचार करुन आजच निर्णय घ्या. अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजूतदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे, चुकीला त्याच्याकडे माफी नाही.आणि नंतरच्या पश्चात्तापाला कोणताही अर्थ आहे का?