Monday, December 23, 2024
HomeUncategorizedचुकीच्या समजुतीतून धर्माच्या नावाखाली अत्याचार……सरसंघचालक भागवत यांचे प्रतिपादन

चुकीच्या समजुतीतून धर्माच्या नावाखाली अत्याचार……सरसंघचालक भागवत यांचे प्रतिपादन

अकोला दिव्य न्यूज : धर्म हा समजावून सांगावा लागतो, तो जर नीट समजला नाही, तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत, ते याच चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले. येथील कंवरनगर परिसरातील महानुभाव आश्रमाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भानखेड येथील गोविंद गुरुकुलमध्ये विशेष कार्यक्रम सुरु आहे. या विशेष कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. मोहन भागवत बोलत होते.

डॉ. मोहन भागवत म्हणाले, थोड्याशा ज्ञानाने खूप फुगलेल्या माणसाला ब्रम्हदेव देखील समजावू शकत नाही, असे सुभाषितामध्ये म्हटले आहे. अशा प्रकारे समजूत काढणे फार जिकिरीचे काम आहे, त्याला समजावयाला जावे, तर समाज म्हणतो, हा चुकीचा आहे, याला हाकला. याला मारा, याला ठोका.

समाजाचे हे सर्व सहन करून समजावावे लागते. म्हणून तो धर्म समजावून सांगण्याचे काम करणारे संप्रदाय असावे लागतात. नुसते पंथ असून चालत नाहीत, तर त्याला विवेक आवश्यक असतो. ज्या पंथाला विवेक प्राप्त होतो, तो पंथ चांगला समाज घडवतो, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले. महानुभाव पंथ आणि संघाचे आध्यात्मशक्तीचे हे कार्य व्यापक स्वरूपात जोमाने सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे दहा वर्षांपुर्वी डॉ. मोहन भागवत हे महानुभाव पंथाच्या वतीने रिद्धपूर येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यावेळी मंचावरून व्यक्त झालेल्या मतांचा संदर्भ देत डॉ. भागवत म्हणाले, अगदी पहिल्यांदा मी या स्थानावर आलो होतो, त्यावेळी असे सांगण्यात आले की, ८०० वर्षांनंतर हिंदू समाजाने आम्हाला आपले म्हटले आहे. ही गोष्ट माझ्या मनाला लागली. हे बरोबर नाही, असे मला वाटले. समाजाचे कुठले अंग, ज्याकडे ८०० वर्षे पाहिलेच गेले नाही, हा अन्यायच आहे, अशी खंत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

अशा प्रकारच्या कार्यक्रमांना यायला हवे, हे माझ्या मनात तेव्हापासून होते, हे सर्व ऋणानुबंध असतात, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. संस्कृती आचरणात आणण्यासाठी जगात वेगवेगळे पंथ, संप्रदाय आहेत. अनेक प्रकारचे पंथ, संप्रदाय, रीतीरिवाज या विविधतेला वेगळे मानता प्रेम, भक्ती निर्माण करावी, असे आवाहनही भागवत यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!