अकोला दिव्य ऑनलाईन : समाज जीवनाला समृध्द करणार्या महाराष्ट्रातील संत विचारांचे तत्वाच्या मूळाशी जाऊन शोध घेणे सद्याच्या युगात अत्यंत गरजेचे आहे. या संतत्वाची अगदी साध्या आणि सोप्या पध्दतीने तसेच सोप्या भाषेत मांडणी केल्यास संत विचार सामान्य माणसांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविता येतो. त्यासाठी ‘रिंगण’ हा संत साहित्याला वाहिलेला विशेषांक प्रयत्नशील असतो असे प्रतिपादन मुंबईचे प्रख्यात पत्रकार तथा ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी केले.
प्रभात किड्सच्या सभागृहात विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला, डॉ गिरीश गांधी फाऊंडेशन व ‘अकोल्याची जत्रा’ संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष सीमा शेटे-रोठे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखत आणि दिलखुलास संवाद तथा ‘महात्मा बसवेश्वर विशेषांक’ प्रकाशन प्रंसगी बोलत होते. वारकरी संतांच्या अनमोल विचारांचा ठेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी एका वारकरी संतांवरील ‘रिंगण’ चा आषाढी विशेषांक प्रसिध्द होत असतो. यावर्षी प्रथमच आषाढी विशेषांकानंतर ‘दिवाळी-कार्तिकी -2024’ च्या ‘महात्मा बसवेश्वर विशेषांका’ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमा प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके यांचे स्वागत किशोर बळी यांनी तर संपादक सचिन परब यांचे स्वागत प्रा.डॉ. सुहास उगले यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.
आपल्या मुलाखतीत परब म्हणाले की, जगण्यामध्ये वेद उतरले आहेत. आपल्या काळानुसार ते समजून घेऊन त्यानुसार आचरण करायला पाहिजे, हा रिंगणचा प्रयत्न असतो. चमत्कार ही भाषा शैली आहे. त्यामधून निर्माण होणार्या कथा आणि आपला दृष्टीकोन विवेक दृष्टीयुक्त ठेवला तर तो चमत्कार माणूसकीकडे नेणारा होतो. सर्व संतांच्या भक्ती परंपरेत समानतेचं तत्व होतं, जातीभेदापलीकडे दृष्टी होती. संतांनी सेवा हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानला आहे. असे उद्बोधक विचार यावेळी मांडले.
प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे तर आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघ; शाखा अकोलाचे कोषाध्यक्ष नीरज आवंडेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभात किड्स स्कूलच्या मराठी विभागाचे प्रमुख चंद्रकांत पोरे यांनी केले. या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला, डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन आणि अकोल्याची जत्रा या तिनही संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव व साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.