अकोला दिव्य ऑनलाईन : शासकीय सेवेत आपल्या हळूवार आणि साहित्यिक मनाला बंदिस्त करून शासकीय धान्य गोदामांचे गोदामपालाचे रुक्षकाम चोखपणे बजावणारे सुभाष काशीद यांच्या पहिले साहित्य अपत्य नुकतेच जन्माला आले आहे.शासकिय सेवेतून वयोमानानुसार निवृत्तीनंतर काशीद यांनी आपल्या आपल्यातील लपवून ठेवलेल्या साहित्यिकाला बाहेर काढले. सातत्याने विविधांगी लेखन सुरू केले. अनेक विषयांवर लेख, स्फुट लेखन आणि कविता लिहिते झाले. आपल्या भावभावनाना वाट मोकळी करून देत काशीद यांनी चौफेर फटकेबाजी केली. शेकडो कविता लिहिल्या आणि अखेर यामधून निवडक कवितांचा संग्रह ‘निरोप’ नावाने जन्माला घातले.
अकोला येथील खडकी परिसरातील रहिवाशी तसेच साहित्यिक कवी लेखक सुभाष काशीद यांचा ‘निरोप’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संभाजीनगर येथे सिने कलावंत रोहित देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मुंदडा, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अरुण देशपांडे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन व सांस्कृतिक संमेलनात एका शानदार सोहळ्यात करण्यात आले.
सुभाष काशीद यांनी लिहिलेल्या कवितेची दखल घेऊन युगंधर मराठी साहित्य व कला सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व त्यांचा सत्कार गौरव सुद्धा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक कवी लेखक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांची ही नवीन वाटचाली खरोखरच कौतुकास्पद असून यासाठी अकोला दिव्य परिवाराचे सदस्य असलेले काशीद यांच अभिनंदन.