अकोला दिव्य ऑनलाईन : शाळेतील मुख्याध्यापकानेच शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करुन अकोला जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेत्याची मुलगी असलेल्या एका शिक्षक तरुणीनेच आमरण उपोषण सुरू केल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपोषणकर्त्या शिक्षिकेविरूद्धही आरोपी शिक्षकाच्या पत्नीने ब्लॅकमेलिंगची तक्रार केली आहे. त्यामुळे, या दोन्ही प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये सत्य बाहेर काढण्याचं काम अकोट पोलिसांना करावं लागणार आहे.
अकोल्यातील जिल्ह्यातील अकोट येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून असलेल्या या तरुणीकडे शाळेतील मुख्याध्यापकानेच शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून शाळेचे मुख्याध्यापक आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही या शिक्षिकेने केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन या प्रकरणात मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल असला तरी अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही, असा आरोपही या तरुणीने केला आहे.
अकोट शहरातील विद्यालयात कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकावर अटकेची कारवाई करत तात्काळ त्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी शिक्षिकेने आमरण उपोषण सुरू केलं आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग मौन बाळगून बसलाय. दरम्यान, उपोषणकर्त्या शिक्षिकेविरूद्धही आरोपी शिक्षकाच्या पत्नीने ब्लॅकमेलींगची तक्रार केली आहे. त्यामुळे, या दोन्ही प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये सत्य बाहेर काढण्याचं काम अकोट पोलिसांना करावं लागणार आहे. मात्र, मुख्याध्यापकांविरुद्धच शिक्षिकेनं आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.