अकोला दिव्य ऑनलाईन : खातेवाटप, मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ कायम राहिल्याने शनिवारी प्रस्तावित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असे सांगितले जाते. मात्र त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. भाजप नेत्यांना अजूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करावी लागत असताना भाजपमध्येही काही नावांवर आक्षेप असल्याचे समजते. दरम्यान शिंदे यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे तर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडून आठवडा उलटला तरीही संपूर्ण सरकार आकारास आलेले नाही. सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सूतोवाच केले होते. फडणवीस यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भाजपच्या मंत्र्यांचे नावे आणि मित्रपक्षांच्या खात्यांवर चर्चा केली होती. शनिवारी विस्तार होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिले होते. पण शुक्रवारी रात्रीपर्यंत विस्ताराबाबत काहीच निर्णय झाला नव्हता. विस्तार रविवारी दुपारी नागपूरमध्ये होईल, असे संकेत सरकारी सूत्रांकडून देण्यात आले. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अजूनही समाधान झालेले नाही. यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस यांनीही शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. महायुतीत शिवसेनेला (शिंदे) १२ किंवा १३ मंत्रीपदे देण्याची भाजपने तयारी दर्शविली आहे. पण खातेवाटपाचा तिढा कायम होता. शिंदे यांना नगरविकासबरोबर महसूल खाते हवे आहे. महसूल सोडण्याची भाजपची तयारी नाही. याशिवाय शिंदे यांच्या काही माजी मंत्र्यांच्या फेरसमावेशास भाजपने आक्षेप घेतल्याने शिंदे यांनी नापसंती व्यक्त केली आहे.
दोन्हीकडून तयारी शनिवारी विस्तार होण्याची शक्यता गृहीत धरून राजभवनवर सारी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने शनिवारी विस्तार करण्याची सूचना केल्यास सारी तयारी झाल्याचे राजभवनातून सांगण्यात आले. सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नागपूरला जाण्याची लगबग सुरू झाली आहे. रविवारी चहापानाच्या पूर्वी दुपारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची योजना आहे. नागपूरमध्ये शपथविधीची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.