Wednesday, December 4, 2024
HomeUncategorizedमोठी बातमी ! देशात पहिल्यांदाच माहेश्वरी विवाह समितीची 'लाडली बेटी' सन्मान योजना

मोठी बातमी ! देशात पहिल्यांदाच माहेश्वरी विवाह समितीची ‘लाडली बेटी’ सन्मान योजना

गजानन सोमाणी : शिक्षणामुळे मुलीच्या लग्नास विलंब होतो आणि अपेक्षाचे ओझे बाळगून स्थळ शोधता शोधता वय वाढत जाते. त्यामुळे मुलींची लग्न करण्याची इच्छा कमी होऊन बाळाला जन्म देण्याची इच्छा राहत नाही, असे एका निरीक्षणातून दिसून आले आहे. याउलट, योग्य वयात लग्न झालेल्या मुली सासरी गेल्यानंतर तेथील परिस्थितीशी लवकर जुळवून घेतात, त्यांचा सुखी संसार चालतो. ही बाब विचारात घेऊन योग्य वयात लग्न व्हावे, यासाठी माहेश्वरी विवाह समितीच्यावतीने समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘लाडली बेटी सन्मान योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत लग्न करणाऱ्या मुलींना १ लाख रुपये तर २४ वर्षापर्यंत लग्न करणाऱ्या मुलींना ३१ हजाराचा सन्मान निधी दिला जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष कांतीलाल राठी यांनी दिली.

या योजनेत दि.१ डिसेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत मराठवाड्यातील माहेश्वरी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या लाडली बेटी सन्मान योजनेचा शुभारंभ माहेश्वरी विवाह समितीच्या कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सभापती संदीप काबरा कार्यक्रमात यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी, सत्यनारायण सारडा, संघटन मंत्री अँड चिरंजीवलाल दागडीया, संयुक्त मंत्री नंदकिशोर तोतला, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य रामनिवास मानधानी, विजय ब. राठी, विजय गो. राठी, विवाह समितीचे अध्यक्ष कांतीलाल राठी, सचिव सुनील बियाणी यांची उपस्थिती होती.

पालकांना प्रेरणा देणारी योजना लाडली बेटी सन्मान योजना ही कल्पना अभिनव असून, या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलींचे लग्न योग्य वयात करण्याची प्रेरणा निश्चितच मिळणार आहे. ही योजना फक्त मराठवाड्यापूरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात राबवावी, असे आपल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन आहे. देशपातळीवर ही योजना राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूत, अशी ग्वाही देतो संदीप काबरा यांनी दिली.

माहेश्वरी समाजातील मुला – मुलीचे विवाह जुळविण्याचे कार्य माहेश्वरी विवाह समिती, जालना गेल्या पंचवीस वर्षापासून करीत असून समितीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ही योजना जरी मराठवाड्यापुरती मर्यादित असली तरी, या योजनेचा प्रचार व प्रसार पूर्ण भारतभर होणार असल्यामुळे पूर्ण समाजाला यातून प्रेरणा मिळेल. या योजनेसाठी उद्योजक आणि समाज बांधवांचे भरीव आर्थिक योगदान लाभले आहे. पालकांनी योग्य वयात मुलींचे लग्न करून, या योजनेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन कांतीलाल राठी, अध्यक्ष, माहेश्वरी विवाह समिती, जालना यांनी केले.

लाडली बेटी सन्मान योजनेच कार्यक्षेत्र संपूर्ण मराठवाडा असून, २१ वर्षाच्या आत लग्न करणाऱ्या पहिल्या ५ मुलींना प्रत्येकी १ लाख रुपये तर २४ वर्षापर्यंत लग्न करणाऱ्या २५ मुलींना प्रत्येकी ३१ हजार रुपयाचा प्रोत्साहन पर सन्मान निधी दिला जाणार असून, हा सन्माननिधी एका समारंभात पात्र पालकांचा सत्कार करून त्यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.

मराठवाड्यातील पालकांनी योग्य वयात मुलींचे लग्न करून या अनोख्या लाडली बेटी सन्मान योजनेचे साक्षीदार बनावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. लाडली बेटी सन्मान योजनेसाठी आर्थिक योगदान देणारे आयकॉन स्टीलचे संचालक जगदीश राठी, संजय राठी व दिनेश राठी, मेटारोल कंपनीचे संचालक द्वारकाप्रसाद सोनी व शिवरतन मुंदडा यांच्यासह सीए डॉ. नितीन तोतला, गणेश बियाणी, सुनील बियाणी, संतोष करवा, द्वारकादास मुंदडा यांचा संदीप काबरा यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष दामोदर बजाज, ओमप्रकाश मंत्री, गोपाल मुंदडा, प्रकाश मालपाणी, लक्ष्मीनारायण मानधना, गोपीकिशन जाजू, रमेश सोडानी, शरद लाहोटी, उमेश बजाज, नंदलाल राठी, पुसाराम मुंदडा, बालाप्रसाद लोहिया, गणेशलाल दरक, सत्यनारायण मंत्री, नंदलाल इंदानी, ओमप्रकाश मंत्री, जगदीश भुतडा, मिठूलाल मंत्री, संतोष बाहेती, दीपक सोमाणी, संजय नागोरी, विजय मालपाणी, जुगलकिशोर होलानी, किरण राठी, मंगल मालपाणी, राजश्री भक्कड, ज्योती तापडिया, साधना मंत्री, डॉ.श्रद्धा होलानी, राणी बाहेती, प्रेमलता मंत्री यांच्यासह विवाह समितीच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष कांतीलाल राठी यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष ताराचंद मालपाणी यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!