अकोला दिव्य ऑनलाईन :देशभरात त्वचादानबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय मारवाडी महिला सम्मेलनतर्फे 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या त्वचा दान आठवड्यात महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व राज्यस्तरावर त्वचा दानाची उपयुक्तता व महत्व या विषयावर रील मेकिंग व लघुनाटिका स्पर्धेत एबीएमएम अकोला शाखेच्या राजश्री सोमाणी लिखित आणि दिग्दर्शित ‘स्किन डोनेशन’ या लघु नाटिकेला महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.या स्पर्धेत पुणे, नागपूर, लोणावळा, तुमसर, हिंगोली, यवतमाळ, अकोट, अकोला, शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राजश्री सोमाणी, छाया खंडेलवाल, प्रीती तिवारी, स्वाती कक्कर यांनी सहभाग घेऊन आपल्या दमदार अभिनयाने अकोल्याला महाराष्ट्रात नावारूपास आणले.
या लघुनाटिकेत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्वचा दान केल्याने सिलिंडर, ॲसिड, विजेचा धक्का, फटाक्यांमुळे माणुसकीचा जळालेल्या चेहऱ्याचा किंवा कोणत्याही अपघातात जळालेल्या व्यक्तीचे जीवन वाचवता येते.यामुळे जखमी व्यक्तीस लवकर बरे होण्यास मदत करुन आपणास अर्थपूर्ण जीवन जगण्याचे समाधान मिळते. या नाटकात मुलीच्या लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांपूर्वी तिचा चेहरा फटाक्यांनी जळाला.चेहरा जळल्यानंतर संबंधित पालकांना डॉक्टरांनी स्पष्ट केले की एलो ग्राफ्टिंगद्वारे त्वचा दान केल्याने जखमा लवकर बरी होण्यास मदत होते. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती त्वचा दान करू शकते आणि त्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणताही विकृती येत नाही, अशी उद्बोधक माहिती या माध्यमातून देण्यात आली. विशेष म्हणजे ही लघु नाटका बघितल्यावर प्रत्येकाला त्वचा दान करण्यास प्रेरणा मिळते.
अकोला मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्षा अनिता उपाध्याय, अंजली उपाध्याय (सचिव), रमा चांडक (खजिनदार) आणि अवयवदान-नेत्रदान समितीच्या प्रमुख सुलोचना सिंगी आणि छाया खंडेलवाल यांच्यासह सर्व अधिकारी व सदस्यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदन करून प्रोत्साहन दिले. सर्व कलाकारांनी आपल्या यशाचे श्रेय महाराष्ट्र राज्याच्या नेत्रदान व अवयवदान प्रकल्पाच्या प्रमुख डॉ.राजकुमारी सुरेश जैन, अकोला शाखेच्या अध्यक्षा अनिता उपाध्याय व सर्व अधिकारी व सदस्यांना दिले आहे.