अकोला दिव्य ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना ‘गेम चेजर’ ठरली आहे. दरम्यान मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात तर्क- वितर्क लावले जात असले तरी पुन्हा एकनाथ शिंदे यांचीच मुख्यमंत्री निवड झाली पाहिजे, अशी जनभावना आहे. त्यातच अकोला शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये झळकलेल्या फलकांनी लक्ष वेधून घेतले. ‘मुख्यमंत्री एकच एकनाथराव शिंदे साहेब’ असे नमूद असलेले फलक शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले.
शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी जनभावना लक्षात घेऊन हे फलक लावले आहेत. या फलकावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ हे मूळचे अकोल्यातील आहेत. त्यांनी सरकार स्थापन होण्याच्या पूर्वीच शहरातील चौकाचौकांमध्ये फलक झळकवले. त्या फलकावर ‘मुख्यमंत्री एकच एकनाथराव शिंदे साहेब’ असे नमूद केले.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते स्व. आनंद दिघे व फलक एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रासह पक्षाचे चिन्ह फलकावर आहे. महत्त्वाचे म्हणजे पवळ यांनी पुढाकार घेऊन काही प्रमाणात अकोला व बुलडाणा जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले आहे.