गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली गेली. तमाम राजकीय विश्लेषक व बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. महायुतीने 288 पैकी सव्वादोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीला अस्मान दाखविले. एकट्या भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाला असून आजवर अनेक निवडणूका पाहिल्या पण अशी निवडणूक यापूर्वी झाली नव्हती.
अनेक दिग्गजांना पहिल्यांदा पराभवाची चव चाखायला लावणा-या या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन. हा विजय सर्वार्थाने शिंदे-फडणवीस-अजित पवार या त्रिमुर्तीच्या ‘एकमुखी’ शक्तीचा ठरतो. सत्ताधारी महायुती शेवटच्या क्षणापर्यंत ‘एक-संघ’ म्हणून लढली. तर त्याचं वेळी मतदानाच्या दिवसांपर्यंत विरोधी महाविकास आघाडी मतदारांसमोर आपली एकसंघता सादर करु शकली नाही. तथापि केवळ एकमुखी वा एकसंघ प्रदर्शनामुळे सत्ताधारी जिंकले असे म्हणणे हे सुलभीकरण झाले. या एक-संघतेला अचूक ‘अर्थ’ आणि ‘धर्म’ यांची सुयोग्य साथ मिळाल्याने सत्ताधाऱ्यांचा हा विजय अधिक सुकर झाला. हे अमान्य करून चालणार नाही.
पंतप्रधान मोदी हे कितीही बोलतं असले तरी ‘रेवडी’ हे भारतीय निवडणुकीत कायमचं परिणामकारक राहिले आहे. रेवडीचे हे प्रारुप राज्यात मागील चार महिन्यांत जाहीर केलेल्या योजनांमधून बाहेर आले आहे. महाराष्ट्र राज्यात ज्यांच्या नेतृत्वात या निवडणूका लढविल्या गेल्या त्या एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या समाजांसाठी आखलेल्या योजनांवर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. अनेक कल्याणकारी (स्व) योजनांमधून निवडणुकीत अत्यंत प्रभावी/परिणामकारक ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ! अस्थिर राजकीय वातावरणात हातात असलेले चार आणे भविष्यातील रुपयाच्या आश्वासनापेक्षा मोलाचे असतात हे राजकीय शाहणपण अंगी असल्याने महिलांनी शिंदेंना भरघोस पाठिंबा दिला. मतदानाचा दिवशी सणवारी सारखं वस्त्रप्रावरणात रांगा लावणाऱ्या महिला दिसून आल्या आणि सरकारला मिळणाऱ्या पाठिंब्याची ही पहिली चुणूक होती. ती शेवटपर्यंत टिकून राहिली. वाढलेल्या मतांमध्ये व मतदारांच्या मिळालेल्या पाठिंब्याचा हा एक “अर्थ” !
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फटकारल्यानंतर भाजपाने लहान-लहान मराठेतर जाती प्रजातींना चुचकारने सुरू केले. विशिष्ट समाजांसाठी महामंडळे, महिलांसाठी वसतीगृहे आदी योजना, ज्या इतरांना कधी होणार, असे वाटत असणा-या उपाययोजनांच्या जोडीने भाजपाने पडद्यामागे लहानसहान वस्त्या,पांडे,खेडी आदी ठिकाणी राज्यभर ‘ओबीसी’ मेळावे घेतले. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या वा केलेल्या चुकांना टाळून भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शरणागत भावाने साथ मिळवून घेतली. स्वयंसेवकांनी मग घरोघरी जाऊन बाजू मांडली. मतदानासाठी प्रोत्साहन दिले. सुप्तावस्थेत मिळालेल्या बहुमताचा हा एक “अर्थ” !
आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक होतं असल्याने मुख्यमंत्री शिंदे व लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक आणि मराठा नेता शरद पवार यामध्ये सुवर्ण मध्य साधत शिंदे आणि अजित पवार यांनी धोरणात्मक हालचाली सुरू केल्या. ‘जाणता राजा’च्या विरोधात अवाक्षरही काढले नाही. तर उलट त्यांच्या हक्काच्या मराठा मतदारांमध्ये विश्वास व आपुलकीची भावना निर्माण केली गेली. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे जरांगे पाटील यांच्याकडून मराठ्यांना निर्णय स्वातंत्र्य दिल्या गेले ते शिंदे-पवार जोडगोळीने केलेल्या प्रयत्नांची, घडामोडींची फलश्रुती आहे. मतदानापुर्वीच राज्यातील मराठा मतदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी एकवटला आणि मतमोजणीत शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या अविस्मरणीय विजयाचा हा एक “अर्थ” !
निवडणूक काळात महायुतीतील भाजप-शिवसेना-अजित पवार राष्ट्रवादी यांच्यातील एकोपा दिवसागणिक वाढत असताना प्रचारात महायुती ‘विकास’चा उदोउदो तर दृश्य आणि अदृश्य पातळीवर ‘धर्म’ हा नारा होतांच. तर महाआघाडीचे नेते ‘आम्ही एक आहोत’ हे शेवट पर्यंत मतदारांना दाखवू शकले नाही.संजय राऊत यांचे बोलघेवडे प्रबोधन, अरेरावीची भाषा, कॉंग्रेस पक्षाचे नाना पटोले यांचा फाजील आत्मविश्वासात, उध्दव ठाकरे यांचं तेच गद्दार, अडाणी, धारावी तर कॉंग्रेस पक्षाचे संविधान, अडाणी आणि सरतेशेवटी तर शरद पवार यांच्या सारख्या जाणता नेताही ही गद्दारांना गाडा, पराभूत करा असं आवाहन करु लागले.सगळा गोंधळ उडाला असताना, मतदानांच्या दिवसापर्यंत शिंदे यांच्या तोडीसतोड म्हणून मुख्यमंत्रीपदासाठी आश्वासक चेहरा दिला गेला नाही. हे देखील मविआ भुईसपाट होण्याचा एक “अर्थ” !
एकादिलाने, एकासूरात आणि एकत्रितपणे वाढल्याने महायुतीने ऐतिहासिक विजय पदरात पाडून घेतले आहे. यात तिळमात्र शंका नाही. भाजपने अंत्यत बारीक सारीक बाबींचा विचार करून, अचूक अंदाज घेत, मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावर (नेतृत्वात) निवडणूक लढविण्याचा भाजपने घेतलेला निर्णय, या निर्णयाला विजयात रुपांतरीत करण्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली तोलामोलाची साथ व रसद तर अजित पवार यांचा संयम व नियोजनाने एक डाव जिंकताना भाजपने 132 जागा पदरात पाडून घेतल्याने आता पुढे काय हा एक ‘अर्थ’ !