अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विजयी होत, हॅट्ट्रिक साजरी करणारे रणधीर सावरकर हे पहिले आमदार आहेत. अकोला पूर्व मतदार संघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदा तिरंगी लढतीत सावरकर यांनी तब्बल 50 हजारांहून अधिकचे मताधिक्य घेतले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नियमानुसार त्यांना विजयी घोषित करुन, प्रमाणपत्र दिले. एकाच मतदारसंघात सलग तीन वेळा विजयी झालेले रणधीर सावरकर यांची मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे.
कधी कॉंग्रेस पक्षाचा गड असलेल्या बोरगाव मंजू मतदारसंघाचे विभाजन करून अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. यानंतर या मतदार संघावर अविभाजीत शिवसेना व सध्याच्या वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. मात्र निवडणुकीत वंचितचे उमेदवार तीन वेळा विजयी झाले.तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहत होती. मात्र भाजप- शिवसेना युतीत भाजपचे रणधीर सावरकर यांनी विजयी होतं मतदार संघ ताब्यात घेतला.मागील 10 वर्षात विकास कामे करत मतदारसंघाची मजबूत बांधणी केली. यंदा उध्दव ठाकरे गटाचे गोपाल दातकर मैदानात उतरल्याने लढाई काट्याची होईल असे वाटत होते.
मात्र माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले रणधीर सावरकर यांनी योग्य व्युहरचना आखत ही निवडणूक केवळ जिंकली नाही तर 50,000 हजाराचे मताधिक्य मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. अंतिम फेरीची मोजणी पुर्ण होऊन रणधीर सावरकर यांना १ लक्ष ८ हजार ६१९ तर महाविकास आघाडीचे गोपाल दातकर यांना ५८ हजार ६ आणि वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांना ५० हजार ६८१ मते मिळाली आहे.