गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : पश्चिम विदर्भातील ‘हाय व्होल्टेज सीट’ असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदानात गत निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा ६ टक्के मतदान वाढले. वाढलेल्या मतदानावर काथ्याकूट सुरु आहे. उद्या मतमोजणीत सर्व उघडकीस येईलच पण वाढलेले मतदान हे सरसकट कोणा एकाच्या बाजूसाठी झालेलं सरसकट मतदान नाही. मतदारसंघात हिंदुत्ववादी मतदान वाढल्याचे बोलल्या जात आहे.तर बंडखोरांबरोबरच त्यांचे समर्थक राहिलेले अनेक ठिकाणी दिसते. यावेळी आपल्या नेत्याने बंडखोर, अपक्ष लढून लक्षणीय मते घेतली तर त्याचा पुढल्यावेळी मुख्य पक्षाकडून उमेदवारीचा दावा प्रबळ राहील, असे गणित समोर ठेवून आपापल्या माणसाला मते दिली गेल्याने मत टक्का त्यामुळेही वाढला आहे. वाढलेल्या मतांमध्ये मुस्लिम आणि दलितांच्या मतांचा मोठा टक्का दिसून येतो. लाडक्या बहिणींच्या मतदानाचे प्रमाण नावडत्या भावापेक्षा (पुरुष) कमी असून येथील निवडणूक जातीय वळणावर आली असतानाही इतर चार मतदारसंघाच्या तुलनेत पश्चिममध्ये मतदान कमी झाले !
विदर्भ, मराठवाड्यात धार्मिक तेढ असलेले मोठे पॉकेट्स आहेत, तिथे ‘एक है तो सेफ है; ‘बटेंगे तो कटेंगे’ हे दोन्ही बाजूंनी जोरात चालले. गणेशोत्सवाची मिरवणूक मशिदीसमोर थांबवून दहा-पंधरा मिनिटे नाचल्याचा आनंद ज्यांना अधिक वाटतो अशांचीही एक व्होट बँक आहे आणि गणेशोत्सवासह शुल्लक कारणावरून राडा करण्यासाठी आसुसलेलेही लोकही येथेच आहेत. या वाढलेल्या मतदानात त्यांचाही वाटा आहे. यासोबतच ‘कॅश अण्ड कॅरी’ची मजबूत साखळी आणि ‘कास्ट’अण्ड कॉस्ट’ माध्यमातून मत देणारी सक्षम यंत्रणा, अशा अनेक घटकांची सक्रियता आणि निष्क्रियता देखील टक्केवारी वाढविण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे.
सरतेशेवटी अपक्ष, बंडखोर, लहान पक्षांचे उमेदवार यांना मतदान केले तर मतविभागणी होऊन समोरच्यांना त्याचा फायदा होईल, असे अनेक ठिकाणी समजवून सांगितले जाते. मतविभाजनाची भीती दाखविली जाते अन् त्यातून मग शेवटच्या टप्प्यात मुख्य दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाला पसंती दिली जाते. यावेळीही अशी भीती दाखविली. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते.त्यामुळेच पश्चिमला लागून असलेल्या अकोला पुर्व आणि जिल्ह्यांतील अकोट, बाळापूर आणि मुर्तिजापूर या मतदारसंघापेक्षा अकोला पश्चिमेच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे.तेव्हा हे वाढलेलं मतदान पश्चिम विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडवून आणू शकतो….