अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या हक्काचा असलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार व माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली असून, येथील दुरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि निवर्तमान आमदार नितीन देशमुख, शिंदे शिवसेनेचे बळीराम सिरस्कार आणि कॉंग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत जाऊन उमेदवारी मिळविणारे अँड.नातिकोद्दिन खतीब यांच्यामधील तिरंगी लढत आता, दुरंगी होत असल्याचे दिसून येते आहे. जवळपास अडिच वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत अगोदर सहभागी होऊन, नंतर माघारी आलेले उध्दव ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांनी त्यावेळी घेतलेल्या भुमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठा करुन बाळापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला.
उबाठा शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार नितीन देशमुख यांना टक्कर देण्यासाठी, व्युहरचना आखताना जातीय समीकरणे लक्षात घेऊन भाजपाच्या पाठिंब्याने वंचित बहुजन आघाडी व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे भाजपात आलेल्या बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी दिली.एवढेच नव्हे तर बाळापूर मतदार संघ उध्दव ठाकरे यांच्याकडून ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे या मतदारसंघावर जातीने लक्ष घालून आहेत. उमेदवाराच्या विजयासाठी ‘रोख चोख’ नियोजन करण्यात कुठल्याही प्रकारचा कसूर राहणार नाही.याची पुरेपूर दक्षता घेतली जाते आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही दिवस बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारात संथपणा जाणवतं होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेचं नियोजन करताना आणि शिंदे यांची सभा झाल्यानंतर प्रचाराचा झपाटा वाढत जाऊन मतदारसंघात वातावरण बदलून गेले. निवडणूक लढण्याचा अनुभव, नेटके नियोजन आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी करून घेत उमेदवार सिरस्कार यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली आहे.मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारी दिल्याने सिरस्कार यांनीही चंग बांधला.शिंदे गटातील नाराजी दूर करण्यासह योग्य समन्वय राखण्यात यश मिळाले.
बाळापूर विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपचा पाठिंबा आणि त्यांचे पाठीराखे तसेच अल्पसंख्याक व इतर जाती जमातींच्या मतदारांचे गणित जुळवून घेण्यासाठी कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पाळेमुळे घट्ट रोवणाऱ्यांवर जबाबदारी सोपवून बळीराम सिरस्कार यांनी तगडे आव्हान उभं केलं आहे.यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अँड खतीब पिछाडीवर गेले असल्याचे मतदारसंघाचा फेरफटका मारताना जाणवते. मतदानाला आजपासून तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असून येत्या दोन दिवसांत अजून चित्र स्पष्ट होईल.