अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रासाठी काल मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. उबाठा शिवसेनेचे अकोला उपशहर प्रमुख नितीन ताकवाले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पश्चिम विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील आणि महानगर अध्यक्ष जयंतराव मसने उपस्थित होते.
आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना नितिन ताकवले यांनी भाजपाच्या नेतृत्वाचा प्रगतीशील विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि स्थानिक नेतृत्वाची दूरदृष्टी ही देशाच्या आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे.
विजय अग्रवाल यांनी ताकवाले यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, ताकवाले यांच्या प्रवेशामुळे भाजपाला पश्चिम मतदारसंघात नवी ऊर्जा मिळेल. ताकवाले यांच्या राजकीय अनुभवाचा भाजपाच्या विजयासाठी उपयोग होईल,असे नमूद केले.
खासदार अनुप धोत्रे आणि आ. रणधीर सावरकर यांनीही पक्षाच्या धोरणांवर विश्वास दाखवून पक्ष वाढीबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रवेशामुळे भाजपाची संघटना अधिक मजबूत झाली असून, महायुतीचे उमेदवार विजयजी अग्रवाल यांना प्रचंड पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.तर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपाचा प्रत्येक निर्णय प्रभावी ठरेल.