अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भरण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटच्या दिवसी भाजपचे बंडखोर उमेदवार हरीश अलिमचंदानी यांनी माघार घेतलेली नाही. तर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर अलिमचंदानी अखेरपर्यंत ठाम राहिले आहेत. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात आता पंचरंगी लढत होणार आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकुण 20 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.जिशान हुसेन यांच्यासोबतच भाजपचे संजय बडोणे, उबाठा शिवसेनेचे प्रकाश डवले, मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग, नंदकिशोर ढोरे, कॉंग्रेसचे मदन भरगड आणि नकीर खान अहमद खान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे या मतदारसंघात भाजपाचे विजय अग्रवाल, कॉंग्रेसचे साजीद पठाण, प्रहार संघटनेचे डॉ.अशोक ओळंबे पाटील, भाजपचे बंडखोर हरीश अलिमचंदानी आणि महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेचे बंडखोर राजेश मिश्रा यांच्यासह 13 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे चित्र आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.जिशान हुसेन यांनी उमेदवारी मागे घेत सर्वांना मोठा धक्का दिला. अनेक वर्षांनंतर यंदा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात नसल्याने, निवडणूक अजून रंजक वळणावर आली आहे. आता अँड आंबेडकर कोणाला समर्थन देतात की काय, हे बघणं देखील मजेशीर होईल. सर्वात अगोदर या मतदारसंघात भाजपचे डॉ.अशोक ओळंबे पाटील यांनी भाजपा वर प्रहार केला.भाजपला रामराम ठोकून बच्चू कडू यांच्या प्रहारचे उमेदवार झाले. डॉ.ओळबे यांच्या बंडखोरीने इतरांना बळ मिळाले. उबाठा शिवसेनेचे राजेश मिश्रा यांची भुमिका महाविकास आघाडीचा पथ्यावर पडणारी असल्याने पक्षप्रमुख कारवाई करणार नाही, हे उघडच होते. या दरम्यान हरीश आलिमचंदानी यांच्या भुमिकेवर सगळ्यांचं लक्ष लागून होते. भाजपाने अखेरचा प्रयत्न केला पण हरीश आलिमचंदानी यांनी ही लढत पंचरंगी केली.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणारे 11 उमेदवार कायम असून या मतदारसंघातून विशाल पाखरे, महेश महल्ले, महेंद्र भोजने, बुद्धभूषण गोपनारायण, सुभाषचंद्र कोरपे, संजय वानखडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
अकोला जिल्ह्यातील 5 मतदार संघांत विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल वैध 113 अर्जापैकी 43 व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली. आता 70 उमेदवार कायम आहेत.