अकोला दिव्य ऑनलाईन : यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला करावे, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. लक्ष्मीपूजन ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहे. मात्र अमावस्या गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी लागत असली तरी लक्ष्मीपूजन शुक्रवार १ नोव्हेंबरला करणे शास्त्रसंमत असल्याचे पंचागकर्त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रीय पंचांगकर्त्या विद्याताई राजंदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.५३ वाजता चतुर्दशी समाप्ती आहे. त्यानंतर अमावस्या सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी ६.१७ वाजता अमावस्या समाप्ती होईल.
गुरुवार ३१ तारखेला प्रदोषकाळात अमावस्येची व्याप्ती अधिक आहे, तर १ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळात अमावस्या अल्पकाळ आहे. दोन्ही दिवशी प्रदोषकाळात अमावस्या असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तीथीनिर्णय या ग्रथांमध्ये म्हटले आहे.
शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी प्रदोष काळ सायंकाळी ५.४४ ते रात्री ८.१५ वाजेपर्यंत आहे. लक्ष्मी पुजनासाठी शुभवेळा दुपारी १२.३० ते २, लाभ वेळा रात्री ९.३० ते ११ पर्यंत आहे. वृषभ या स्थिर लग्नाची वेळ सायंकाळी ६.३३ ते ८.३२ अशी आहे. यापैकी कोणत्याही वेळात लक्ष्मीपूजन करता येईल, असे राजंदेकर यांनी स्पष्ट केले आहे.
दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, निर्णय सागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग, तसेच भारतातील जवळ जवळ शंभरपेक्षा अधिक पंचांगांत आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्ये सुद्धा १ नोव्हेंबर रोजीच लक्ष्मीपूजन करावे, असे म्हटले आहे.
यंदा दिवाळी ४ दिवस आहे. त्यात ३१ ऑक्टोबर गुरुवारी नरक चतुर्दशी, १ नोव्हेंबर शुक्रवारी लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबर शनिवारी दिवाळी पाडवा आणि ३ नोव्हेंबर रविवारी भाऊबीज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी अकोला दिव्य केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून अकोला दिव्य कोणताही दावा करत नाही.)