Wednesday, October 30, 2024
Homeताज्या घडामोडी6 नोव्हेंबरला राहुल गांधी फुंकणार नागपुरातून निवडणुकीचे रणशिंग

6 नोव्हेंबरला राहुल गांधी फुंकणार नागपुरातून निवडणुकीचे रणशिंग

अकोला दिव्य ऑनलाईन : लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून करणार आहे. ते ६ नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खा.राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून सायंकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास ‘आघाडीची गॅरंटी’ जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षण बचावचा मुद्दा प्रचार घेतला होता. या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी झाली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील हाच मुद्दा चर्चेत राहील यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून संविधान सन्मान संमेलन घेऊन समाजातील बुद्धिजीवांना आवाहन केले जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका होती. त्यामुळेच त्यांना संविधान निर्माते असे संबोधले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात धम्मदीक्षा घेतली. त्यादृष्टीने नागपूर शहराला डॉ. आंबेडकरांच्या जिवनात वेगळे स्थान आहे. या सर्व बाबींचा विचार करून काँग्रेसने संविधान सन्मान संमेलनातून निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात येत आहे.

हरियाणातील निवडणुकीत काँग्रेसला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातून धडा घेत काँग्रेसने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मवाळ भूमिका घेतली. महाराष्ट्रात विजय मिळवण्यासाठी दोन पावले मागे टाकण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. शिवाय हरियाणात जाट विरुद्ध दलित, इतर असे चित्र भाजपने तयार केले होते. अशाप्रकारे कथानक महाराष्ट्रात निर्माण होणार नाही. याची काळजी काँग्रेस घेत आहे.

यासाठी संविधानचा मुद्दा यावर दिला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज ४ नोव्हेंबरपर्यंत मागे घेता येणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. २० नोव्हेंबरला मतदान केले जाणार आहे. तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला केली जाईल. महाराष्ट्रात नवीन सरकार २६ नोव्हेंबरला स्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मतमोजणी प्राथमिक कल येताच सर्व पक्षांना सरकार स्थापनेचे गणित मांडण्याची सतर्कता ठेवावी लागणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने अशी तंतोतंत मतमोजणीची तारीख निश्चित करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!