Wednesday, November 20, 2024
Homeराजकारणआज अंतिम संधी ! 'नॉमिनेशन' चा शेवटचा दिवस : आता जागावाटप दिवाळीनंतरच...

आज अंतिम संधी ! ‘नॉमिनेशन’ चा शेवटचा दिवस : आता जागावाटप दिवाळीनंतरच ?

अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे. मात्र सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत कायम आहे. दोन्ही आघाड्यातील सहा प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या असल्या, तरी नेमके कोणता पक्ष किती जागा लढणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

आज अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाकडून साजिद खान पठाण आणि अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून गोपाल दातकर रितसर अर्ज दाखल करणार आहे.तर भाजपाचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे प्रहारकडून आणि ठाकरे गटाचे राजेश मिश्रा देखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्यास पक्षांना वेळ मिळणार आहे. त्यामुळे जागावाटपाचे नेमके चित्र दिवाळीनंतरच स्पष्ट होईल, असे मानले जात आहे.

भाजपने १४६ उमेदवार जाहीर केले असून त्यामुळे शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांना मनासारख्या जागा सोडल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीत जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून, केवळ १० टक्के जागांचा प्रश्न असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दोन महिन्यांपूर्वी केला होता.

मात्र सत्ताधारी पक्षांमध्ये अद्याप एकवाक्यता झाली नाही. भाजपने १४६, शिवसेनेने (शिंदे) ८०, तर राष्ट्रवादीने (अजितदा) ४९ उमेदवारांची घोषणा केली आहे. लोकसभेत शिंदे यांच्या मनाप्रमाणे जागावाटप झाले होते. आता मात्र भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. भाजप १५० किंवा त्यापेक्षा अधिक जागा लढणार आहे. शिवाय भाजपने काही इच्छुकांना शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांमध्ये पाठविले आहे. मित्र पक्षांपैकी रिपब्लिकन आठवले गटासाठी एकही जागा सोडण्यात आलेली नाही. आठवले यांना केंदात राज्यमंत्रीपद दिले एवढेच पुरेसे आहे, अशी टिप्पणी भाजपकडून केली जात आहे.

महाविकास आघाडीतही कॉंग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यातील धुसफुस कायम आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जागावाटपाची चर्चा लवकरात लवकर संपवून प्रचारावर भर देण्याची रणनीती मविआतील नेत्यांनी आखली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस उजाडला तरीही जागावाटपावर सहमती होऊ शकली नाही.

महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शेवटपर्यंत घोळ सुरू होता. महाविकास आघाडीत काही मतदारसंघांमध्ये परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यावर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. जागावाटपात पुरेसे प्रतिनिधित्व दिले गेले नसल्याने मविआतील छोटे पक्ष नाराज असून ते आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!