अकोला दिव्य ऑनलाईन : Congress Candidates List For Maharashtra Assembly Election 2024 : भारतीय जनता पक्षाचा अभेद्य किल्ला असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मागील वर्ष २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांना काट्याची टक्कर देत अवघ्या 2500 मतांनी पराभव झालेले कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार साजीद खान पठाण यांच्या उमेदवारीवर काल रात्री उशिरा शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी जाहीर झाल्यानंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाकडून साजीद खान पठाण हेच रिंगणात राहतील, असा दावा ‘अकोला दिव्य’ कडून केला गेला होता आणि तो खरा ठरला.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षामधून सुमारे 18 उमेदवार इच्छुक होते. ज्यामध्ये साजिद खान पठाण, रमाकांत खेतान आणि डॉ. जिशान हुसेन या तिघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असताना, अखेर पठाण यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. साजिद खान पठाण हे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते असून त्यांच्या या उमेदवारी नंतर याठिकाणी चुरस वाढली आहे.
भाजपात बंडखोरीची शक्यता जास्त असून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश मिश्रा देखील निवडणूक लढविणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. यासोबतच भाजपाचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे प्रहारकडून रिंगणात राहतील असा दावा केला जात आहे. यामुळे येथील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने कोणीही निकालाबाबत छातीठोक दावा करु शकतं नाही.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा घोळ अद्याप संपलेला नाही. मविआ नेत्यांनी ८५-८५-८५ चा फॉर्म्युला सांगितला होता. मात्र, काँग्रेसने यापूर्वीच १०० उमेदवार जाहीर केले होते. आता त्यांनी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीद्वारे त्यांनी एकूण सहा उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी चार उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. तर, दोन उमेदवार झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आहेत. दरम्यान, काँग्रेसने नव्या यादीद्वारे एक उमेदवार बदलला आहे. त्यामुळे काँग्रेसने आतापर्यंत १०३ शिलेदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
काँग्रेसने पश्चिम विधानसभा मतदारसंघातून साजिद खान मन्नन खान यांना उमेदवारी दिली आहे. तर, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून चेतन नरोटे यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. पक्षश्रेष्ठींनी येथून आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती.
मात्र, आता त्यांच्याऐवजी मधुरीमाराजे छत्रपती यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार बदलला जाईल, अशी चर्चा होती, जी खरी ठरली आहे. यासह काँग्रेसने कुलाब्यामधून हिरा देवासी यांना उमेदवारी दिली आहे. हिरा यांचा भाजपा उमेदवार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी सामना होणार आहे.