अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुक लढवायची म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा दावा फेटाळून इतरांना उमेदवारी दिली गेली किंवा उमेदवारी मिळणारच नाही, हे उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात पक्षांतराची लाट आली आहे. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदराव पवार पक्षाने वंचित बहुजन आघाडीतून आलेल्या सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी जाहीर करताच, या पक्षाचे रवि राठी यांनी आज तुतारी सोडली आणि कमळ हाती घेतले. यावेळी पश्चिम विदर्भातील जेष्ठ नेते व माजी मंत्री संजय कुटे उपस्थित होते.विशेष म्हणजे भाजपाने अद्याप येथे उमेदवारी जाहीर केली नसल्याने आणि हरीश पिंपळे यांच्या विरोधात वातावरण असल्याने रवि राठी यांच्या भाजप प्रवेशाला वेगळ्या पध्दतीने बघितले जात आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात रवि राठी यांनी अखंड राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुक लढवून तब्बल ४२ हजारांच्यावर मतें घेऊन सर्वांना धक्का दिला होता. आता विभाजित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून २०२४ ची निवडणूक लढविण्याची राठी यांनी तयारी केली होती. आपल्याला उमेदवारी मिळणार असा विश्वास होता. पण पवर गटाने डोंगरदिवे यांना उमेदवारी जाहीर केली.यामुळे राठी यांनी पक्षांतर करुन आज भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात रितसर प्रवेश केला. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना राठी यांनी तिसऱ्या क्रमांकावर राहून मिळविलेले ४२ हजाराचे मतदान लक्षणिय असल्याने भाजप पक्षश्रेष्ठी वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.