अकोला दिव्य ऑनलाईन : भारतात मागील काही काळापासून रेल्वेला होणाऱ्या अपघाताच्या घटना वारंवार समोर येत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता अशातच भुसावळ मार्गे धावणाऱ्या शालिमार-कुर्ला शालिमार एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची घटना नागपूरमधून समोर आली आहे. शालीमार एक्स्प्रेसचे डब्बे रुळावरून घसरल्याचे वृत्त पसरताच स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्रवाशांच्या काळजात धडधड वाढली आणि मोबाईल वरुन विचारणा केली जाऊ लागली. नशिब बलवत्तर म्हणून कुठलीही प्राणहानी झाली नाही. एकमात्र खरं की अलिकडच्या काळात रुळावरून रेल्वे घसरण्याचे प्रमाण एवढे वाढत चालले आहे की, आता रेल्वे प्रवास सुरक्षित राहीला नाही, अशी विचारणा केली जाऊ लागली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. मुंबईहून येणारी शालिमार एक्सप्रेस इतवारी रेल्वे स्थानकावर येताच अचानक रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे S-1 आणि S-2 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन क्रमांक १८०२९ शालीमार एक्स्प्रेस मुंबईहून शालीमारकडे जात होती. या अपघातात अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.