अकोला दिव्य ऑनलाईन : स्वराज्य इंडिया पक्षाचे संस्थापक तथा भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांच्या शहरातील सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी गोंधळ घातला. त्यांचे भाषण रोखत धक्काबुक्की, घोषणाबाजी केली. यावेळी खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘महाराष्ट्र डेमॉक्रेटिक फ्रंट’ च्यावतीने विचारवंत तथा राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्या विचारसभेचे सोमवारी दुपारी शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत’ या विषयावर योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू होण्या अगोदरच वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने आरक्षणविरोधी भूमिका घेतली आहे. आरक्षण संपवण्याची भाषा काँग्रेस करीत असताना त्यांना मतदान कसे करावे, असा प्रश्न योगेंद्र यादव यांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला.
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यावर काँग्रेसने कुठलीही कारवाई केली नाही. भाजपविरोधी मत व्यक्त करताना मतदारांनी मतदान कुणाला करावे, यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीवंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
एका चिठ्ठीतून भारत कोण जोडत व कोण तोडत आहे ? बाबरी मशीद कोणी तोडली? त्याची जबाबदारी कोणाची ? लोकशाही वाचविणारे कोण आहे ? असे अनेक प्रश्न योगेंद्र यादव यांना विचारण्यात आले. व्यासपीठावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने मोठा वाद निर्माण झाला. दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांकडून बाचाबाची झाली. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की केली.