अकोला दिव्य ऑनलाईन : इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जागतिक बाजारात दिसू लागला आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढताच भारतासह स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली. शनिवारी एकाच दिवसात चांदी ३,८०० रुपयांनी वाढून भाव ९७,३०० रुपयांवर पोहोचले. सराफांकडे तीन टक्के जीएसटीसह भाव १,००,२१९ रुपयांवर गेले. अर्थात चांदीने एक लाखाचा आकडा पार केला. दरवाढीनंतरही ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी आहे.
गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारात सोने-चांदीच्या बाजारात जबरदस्त तेजी बघायला मिळत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यात १९ दिवसांत जीएसटीविना शुद्ध चांदीचे प्रतिकिलो दर ५,१०० रुपयांची वाढले. शनिवारी दहा ग्रॅम सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ होऊन भाव ७८ हजारांवर गेले. तीन टक्के जीएसटीसह ८०,३४० रुपयांत विक्री झाली.
औद्योगिक क्षेत्राकडून प्रचंड मागणी
महागाईचा वाढता दबाव आणि सर्वच औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढल्याने चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. तसे पाहता चांदीच्या दरात जानेवारीपासून हळूहळू वाढ होऊ लागली. यंदा केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलैला संसदेत सादर करण्यात आला. त्यादिवशी चांदीचे प्रतिकिलो भाव ८८,५०० रुपयांवर होते.
चांदीवर ६ टक्के सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा होताच भाव २,७०० रुपयांची कमी होऊन ८५,८०० रुपयांवर स्थिरावले. २५ जुलैला पुन्हा ८२,२०० रुपयांपर्यंत घसरण झाली. मात्र, तेव्हापासून १९ ऑक्टोबरपर्यंत चांदीचे भाव किलोमागे तब्बल १५,१०० रुपयांनी वाढले. ऑक्टोबर महिन्याचा विचार केल्यास १ ऑक्टोबरला चांदीचे जीएसटीविना प्रतिकिलो ९२,२०० रुपये होते. ५ रोजी ९३,५००, १० रोजी ९०,५००, १६ ऑक्टोबरला ९१,७००, १७ रोजी ९२,२००, १८ रोजी ९३,५०० आणि १९ ऑक्टोबरला चांदीचे दर ९७,३०० रुपयांपर्यंत वाढले. तीन टक्के जीएसटीसह चांदीची १,००,२१९ रुपयांत विक्री झाली.
शुद्ध चांदीचे दर :
महिना प्रतिकिलो भाव
२५ जुलै ८२,२००
१ ऑक्टो. ९२,२००
५ ऑक्टो. ९३,५००
१० ऑक्टो. ९०,५००
१५ ऑक्टो. ९१,७००
१६ ऑक्टो. ९३,०००
१७ ऑक्टो. ९२,१००
१८ ऑक्टो. ९३,५००
१९ ऑक्टो. ९७,३००
(उपरोक्त भावावर ३ टक्के जीएसटी वेगळा)