अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. आमदार राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदंरसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, या मेळाव्यानंतर आमदार शिंगणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. ‘या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढावावी याचे विचारमंथन करण्याच्या दृष्टीने आजची बैठक होती, असं विधान आमदार शिंगणे यांनी केले आहे. यामुळे या निवडणुकीआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सिंदखेड राजा येथे आज आमदार राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार राजेंद्र शिंगणे म्हणाले, या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले. निवडणूक कोणत्या चिन्हावर लढावी यासाठी बैठक होती. मी अजित पवार यांच्या गटात काम करणारा आमदार म्हणून काम करतो हे सगळ्यांना माहित आहे. गेल्या काही दिवसापासून मला अनेक कार्यकर्ते भेटत आहे, भेटणारी ९० ते ९५ टक्के लोक मला खासदार शरद पवार यांच्या पक्षाच्या ‘तुतारी’ चिन्हावर लढण्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे आता काल निवडणूका जाहीर झाल्या आहेत, याआधी कार्यकर्त्यांच्या मनात भावना काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे यासाठी आजची बैठक आम्ही आयोजित केली होती, अशी माहिती आमदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
आज झालेल्या बैठकीत ९० टक्के कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याची मागणी केली आहे. पण मी बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन माझा निर्णय ठरवणार आहे.मी कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेणार असल्याचे सांगत आमदार राजेंद्र शिंगणे यांनी तुतारी चिन्हावर विधानसभा लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
‘एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही’
माझे शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षापासून संबंध आहेत. मी सुरुवातीला अपक्ष निवडून आलो असलो तरी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. मला त्यांनी मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली. मी अजित पवार यांच्यासोबत असतानासुद्धा पवार साहेब यांच्यावर ज्यावेळी टीका केल्या त्यावेळी मी पवार साहेबांची बाजू घेऊन टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.