अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अकोट येथील शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर या दोघां भावांचा सहभाग असल्याचे पोलिसांना चौकशीत निष्पन्न आले आहे. मुंबई पोलिसांनी पुण्यातून प्रवीण लोणकरला ताब्यात घेतले असून न्यायालयाने २१ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हॅन्डलर असलेला शुभम अद्यापही फरार असून पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अकोट येथे कॉलेजमध्ये शिकत असताना शुभम हा एनसीसी कॅडेट होता. राजस्थानमध्ये भरती प्रक्रियेदरम्यान तो लॉरेन्स बिष्णोई टोळीचा संपर्कात आला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत असताना, पहिल्यांदा राजस्थानमध्ये भरती प्रक्रियेदरम्यान, तो लॉरेन्स बिष्णोई टोळीचा संपर्कात आला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभम लोणकर हा लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सतत संपर्कात होता. असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
शुभम याचे कुटुंबीय मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी आहे. अकोट सोडून २०११ पासून शुभम हा पुण्यात राहण्यास आला होता, तर २०१९ मध्ये त्याचे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहण्यास आलेले होते. तेव्हा शुभमने भावासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. २०२२ मध्ये पुणे येथील वारजे परिसरात ‘लोणकर डेअरी’ नावाने त्यांनी दुकान उघडले होते. या व्यवसायाला चांगला प्रतिसादही मिळत होता. असेही समोर आले आहे.
दरम्यान अकोला पोलिसांनी प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांना अकोट येथून आर्म्स अॅक्ट गुन्ह्यात अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल आणि काडतूसे देखील जप्त केली होती. तेव्हा शुभम लोणकरचे बिष्णोई टोळीसोबत संबंध असल्याचे स्पष्ट झाले. अकोला येथील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचा भाऊ प्रवीण डेअरीचे काम पाहत होता, तर शुभम हा जुलै महिन्यापासून पसार झाला. या काळात शुभम अनेक वेळा मुंबईला ये-जा करत असे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील हल्लेखोरांना राहण्यासाठी प्रवीण लोणकरने रुम भाड्याने दिली होती. तसेच हल्लेखोर लोणकर डेअरी शेजारी स्क्रॅप दुकानात काम करत होते.