प्रा.मधु जाधव • अकोला दिव्य ऑनलाईन : आदर्श सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव नारे यांच्या समर्थ मार्गदर्शनात त्यांचे उच्च विद्याविभूषित पुत्र डॉ.गजानन नारे व वंदनाताई नारे हे दांपत्य गत २० वर्षांपासून झपाटल्यागत, अत्यंत काटेकोरपणे, नितीमूल्य जपत शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहेत. अकोला शहरात, प्रथम प्लेग्रुप, नर्सरी पासून सुरू केलेलं कार्य आज शहरापासून ६- ७ किमी. अंतरावर अकोला वाशिम मार्गावर अवघ्या महाराष्ट्रात ‘प्रभात डे बोर्डिंग स्कूल ‘ या नावाने ओळखली जाणारी तीन मजली वास्तू ताठ मानेने उभी आहे. ‘प्रभात’मध्ये सीबीएससी पॅटर्न अंतर्गत ‘ केजी टू एचएससी ‘ पर्यंतचे शिक्षण दिले जाते. कालांतराने या वास्तूमागेच तीन मजली ‘विद्यार्थी भोजनालय’ देखील उभे आहे. एकाच वेळी हजाराच्यावर विद्यार्थी भोजन अवकाशात, शुध्द, प्रोटिनयुक्त आणि प्रसन्न वातावरणात भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात.प्रभातमध्ये अभ्यासक्रमासोबतच भारतीय संस्कार व संस्कृतीचे विचारही विद्यार्थ्यांवर बिंबवले जातात. इतकंच नव्हे तर , विविध कला व संगीतासोबतच क्रीडाक्षेत्रातील बहुतांश खेळांचं प्रशिक्षणही शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलं जातं. प्रभातच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार कुठल्या ना कुठल्या कला वा क्रीडा प्रकारात भाग घ्यावाच लागतो.
अभ्यासक्रमातील प्रत्येक विषय असो वा कला व खेळासाठी अत्यंत अनुभवी- तज्ञ आणि अत्यावश्यक शिक्षकांची नियुक्ती स्कूल मध्ये केली आहे.’प्रभात’ चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष दिलं जातं ! त्यामुळेच काही वर्षातच प्रभातने संपूर्ण विदर्भात नावलौकीक मिळवला आहे. अख्ख्या विदर्भात प्रभात हे एकमेव डे बोर्डिंग स्कूल असावे.
याचं सारं श्रेय जातंय, ते मुख्य संचालक डॉ. गजानन नारे व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदनाताई नारे यांच्या अपार कष्टाला…! पण, केवळ याने भागात नसतं. अत्यंत दर्जेदार संस्कारक्षम आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा ध्यास – अभ्यास अन् अत्याधुनिक प्रवाही शिक्षण देण्याबाबतची दृष्टी अन् नवनविन प्रयोग करण्याची वृत्ती असावी लागते… आणि हे सारं या दांपत्यामध्ये असल्यानेच प्रभात ही शिक्षणसंस्था नव्हे तर, खऱ्या अर्थाने विद्यामंदिर ठरली आहे. सोबतीला प्रभातचे सचिव आणि सुमारे दोन हजार मुलांना ठराविक वेळी दररोज दूध, फ्रूटस, नास्ता आणि भोजन व्यवस्था काटेकोरपणे व जबाबदारीने संभाळणारे..साऱ्या विद्यार्थ्याचे आवडते नीरज आवंडेकर यांचे निकोप पाठबळ ! सर्वात महत्त्वाचं म्हणजे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांची निःस्पृह सेवा !
महाराष्ट्र शासनद्वारा ‘मुख्यमंत्री – माझी शाळा,सुंदर शाळा ‘ ही योजना राबविण्यात आली. विविध निकष ठरवून त्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या मार्फत राज्यातील विना अनुदानित गटातील शाळांची प्रत्यक्ष काटेकोर पाहणी करीत ठरविलेले निकष तपासले गेले. राज्यात शिक्षण क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे कार्य करणाऱ्या अनेक विना अनुदानित शाळांचा यामध्ये समावेश होता. ही स्पर्धा प्रक्रिया बरेच दिवस चालली. या साऱ्या शाळांमध्ये शरद पवार यांच्या बारामतीची तथा रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील शाळा देखील शेवट पर्यंत स्पर्धेत होत्या. पण शेवटी प्रभात डे बोर्डिंग स्कूलने बाजी मारत, प्रथम पुरस्कार व ५१ लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार मिळवला.आणि पवारसाहेब व दानवे साहेबांच्या शाळांना दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
प्रभात डे बोर्डिंग स्कूलचे हे यश केवळ संस्थासंचालकांचेच नव्हे तर अवघ्या ‘प्रभात’ परिवाराचे आहे. तेव्हा डॉ.गजानन नारे, वंदनाताई व नीरज आवंडेकरासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हे सारे श्रेय जातं. प्रभातचा गौरव अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे.!