अकोला दिव्य ऑनलाईन : यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होऊन आज शनिवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५७ मिनिटाला नवरात्र उत्सवाची सांगता होत आहे. म्हणजेच आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आज १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरू होत असून उद्या रविवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ०८ मिनिटांनी ती समाप्त होईल. त्यामुळे यंदा दसरा १२ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजनाची शुभ वेळ दुपारी २ वाजून २ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४८ मिनिटांपर्यंत आहे. प्राचीन काळी क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत असत. या दिवशी ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने असत्याचा पराभव केला होता. तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही युद्ध सुरू झाले तरी त्यांचा विजय निश्चित होतो, असे मानले जात होते. या काळात युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जात असे. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.
पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या (आपट्याच्या) झाडावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराट राजाच्या गाई पळविणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. त्याशिवाय दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून आजही गावोगावी वाटली जातात.
हिंदू पंचांगानुसार या वर्षी दसऱ्याला एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे. यंदा दसऱ्याला सर्वार्थ सिद्धी योगासह श्रावण योगही तयार होत आहे. १३ऑक्टोबर रोजी पहाटे ५.२५ ते ४. २७ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. त्यासोबतच श्रवण नक्षत्र आज शनिवार १२ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजून २५ मिनिटांपासून ते उद्या रविवारी १३ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील.
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जाणारा दसरा हा सण वाईटावर विजयाचे प्रतीक मानला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. चला तर मग, साजरा करु या दसरा