अकोला दिव्य ऑनलाईन : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे, अशा 11 हजार 836 शेतकऱ्यांचा बँक खात्यावर 4 हजार 670 लाख रुपये शासनामार्फत जमा करण्यात आले आहेत. यामध्ये अकोला जिल्हयातील 20 हजार 512 शेतकऱ्यांना 89.49 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रं. प्रोअयो 0622/ प्र.क्रं.72/2 -स मुंबई दि.29 जुलै 2022 नुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ मध्ये पात्र/अपात्रतेची कारणे नमुद केलेली असुन सन 2017-2018, 2018-2019 आणि 2019-2020 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षात पीक कर्ज घेवुन त्याचा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत राज्यातील 33 हजार 356 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे ऑगस्टमध्ये शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. तेव्हा त्यांना आधार प्रामाणीकरणासाठी 12 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत संधी देण्यात आली होती. या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या 11 हजार 826 शेतकऱ्यांचा बँक खात्यात 46.70 कोटीची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम आज बुधवार ९ ऑक्टोबरला वर्ग करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील पिक कर्जाची नियमित परतफेड करणा-या आणि आधार प्रमाणीकरणाअभावी प्रोत्साहनाच्या लाभापासुन वंचीत राहीलेल्या 374 लाभार्थी शेतकऱ्यांचे 1 कोटी 72 लाख रुपये शेतकऱ्यांचा बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातील 108 एवढे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापुर्वी मयत झाले असुन त्यांच्या वारसांच्या नोंदी करण्याचे काम सुरु आहे. अशा शेतकऱ्यांचा वारसांनी वारस प्रमाणपत्राशी संबधीत कागदपत्रे घेऊन संबधित बँकांशी संपर्क साधावा. जेणे करुन वारसांना प्रोत्साहनाचा लाभ देता येईल असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रविण लोखंडे यांनी केले आहे.