अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. इंदापूर मतदारसंघातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे पाटील भाजपाला रामराम करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटलांच्या रुपाने भाजपाला आणखी एक धक्का बसला आहे. याआधी समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर लोकसभेला सोलापूरमधून मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली. महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मागील ५ वर्ष या मतदारसंघात तयारी करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी दुसरा पर्याय शोधला. हर्षवर्धन पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. त्यात आज सिल्व्हर ओकवर झालेल्या भेटीत हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झालं आहे.
पवारांकडूनही इंदापूर विधानसभेसाठी तुतारी चिन्हावर लढण्याचे संकेत हर्षवर्धन पाटील यांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूर मतदारसंघात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. महायुतीत ज्याचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा फॉर्म्युला वापरण्यात आला. त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज होते. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. लोकसभेवेळीच विधानसभेचा शब्द द्या अशी भूमिका तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून घेतली जात होती. स्वत: फडणवीस यांनी इंदापूरात जात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. मात्र विधानसभेला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारला.
कार्यकर्त्यांकडून तुतारी चिन्हावर लढण्याचा आग्रह
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे मतदारसंघात गाठीभेटी आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढायचीच असा चंग हर्षवर्धन पाटील यांनी बांधला आहे. त्यात कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घ्या असा आग्रह धरण्यात येत होता.