Thursday, January 2, 2025
Homeगुन्हेगारीबुलढाण्यात ‘धडक’ मार्गे हत्या ! कारने उडविले, पत्नीचा मृत्यू, साळा गंभीर

बुलढाण्यात ‘धडक’ मार्गे हत्या ! कारने उडविले, पत्नीचा मृत्यू, साळा गंभीर

अकोला दिव्य ऑनलाइन : घरगुती वादामुळे वेगळ्या राहणाऱ्या पत्नीला कायमचं संपवायचे त्याने ठरविले. त्यासाठी निष्ठुर आणि विकृत बुद्धीच्या नवऱ्याने वेगळाच ‘फंडा’ वापरला.आपल्या भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या पत्नी आणि शालक (साळा) यांना जाणीवपूर्वक धडक दिली.यात पत्नीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या साळ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नराधम पतीने विभक्त राहणाऱ्या पत्नीला कायमचे संपविण्याच्या या घटनेने चिखली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विकृत बुद्धीच्या नवऱ्याचे नाव समाधान सुरडकर असून तो चिखली तालुक्यातील बेराळा येथील राहणारा आहे. मृत विवाहितेचे नाव सविता समाधान सुरडकर ( रा. बेराळा, हमु आळंदी, पुणे) आहे.

चिखली पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती समाधान सुरडकर आणि पत्नी सविता सुरडकर दोघे सध्या वेगवेगळे राहत होते. त्यांचे प्रकरण चिखली न्यायालयात सुरू आहे. ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाची तारीख असल्याने सविता ‘कोर्टात’ तारखेवर हजर राहिली. तेथील काम झाल्यावर चिखली शहरातील मंडई मध्ये भाजीपाला खरेदी करत होती. त्यावेळी संतोष इंगळे नामक इसम आणि त्याच्या पत्नीने सविता सोबत वाद घातला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी सविताने चिखली पोलीस ठाणे गाठले. दरम्यान या घटनेची माहिती तिने मावस भाऊ केशव भानुदास महाले यांना फोन करून दिली. यावर केशव महाले लगेच पोलीस ठाण्या मध्ये पोहचले. त्यांनी मध्यस्थी करून तक्रार द्यायची नाही असे ठरवले.

दुचाकी बाजूला घेतल्यावरही…
या प्रकारानंतर केशव महाले हे मावस बहीण सविता हिला मोटारसायकल वर बसवून घराकडे निघाले. यावेळी नवरा समाधान सुरडकर हा भरधाव वेगाने बलेनो कारने पाठीमागुन येत असल्याचे सविताने पाहिले. गाडी डाव्या बाजूने सुरक्षित घे असे सविताने मावस भाऊ केशव यांना सांगितले. गाडी डाव्या बाजूने सुरक्षित असताना देखील समाधान सुरडकर याने केशव महाले यांच्या दुचाकीला वेगात धडक दिली. या धडकेत सविता व केशव दोघे गंभीर झाले. या घटनेनंतर धडक मारणारा सविताचा नवरा, बायको रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना देखील तिथून फरार झाला.

दरम्यान दोघा जखमींना चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने सविताला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. सविताने अनेक तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर ती अपयशी ठरली. काल रात्री उशिरा सविताची प्राण ज्योत मालविली. याप्रकरणी सविताचा मावस भाऊ केशव महाले यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आधी खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता काल रात्री उशिरा त्यात खुनाचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. घटनेनंतर फरार झालेल्या क्रूरकर्मा पतीचा चिखली पोलिसांचे पथक कसोशीने शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!