अकोला दिव्य ऑनलाईन : शेतकऱ्यांचा सोयाबीनला ८ हजार ५०० रुपये हमी भाव व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील औसा येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा दिला असून, या मागणीसाठी तात्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करा अन्यथा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा अकोला जिल्हा छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रणजित काळे पाटील यांनी दिला आहे. या अनुषंगाने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला केंद्र सरकारने ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र या भावात तर खर्चही निघत नाही. तेव्हा सोयाबीनला ८ हजार ५०० रुपये हमीभाव घावा. तरच शेतकऱ्यांचा हातात काही पैसा शिल्लक येईल. कारण उत्पन्नापेक्षा सोयीबीन पेरणी व काढणीचा खर्च जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने ८ हजार ५०० रुपये भाव द्यावा. यासोबतच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी. लातूर जिल्ह्यातील औसा येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांचे या मागणीसाठी आमरण उपोषणास सुरू आहे.
या उपोषणाला अकोला जिल्हा छावा संघटनेने देखील जाहीर पाठींबा दिला आहे. राज्य सरकारने यावर सकारात्मक विचार करुन तात्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा अकोला येथील कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करण्यात येईल, यामुळे काही अघटीत घडले तर सर्व जबाबदारी सरकारची असेल. याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन अकोला जिल्हा अध्यक्ष रणजित काळे पाटील यांनी दिले आहे. या निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पाटील, महेंद्र भगत, बाळू वानखडे, ज्ञानेश्वर गावंडे, राजु शहा यासह छावा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.