अकोला दिव्य ऑनलाईन : एका फायनान्स कंपनीच्या एरिया मॅनेजरने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेहाजवळ ५ पानी सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं की, गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीचे अधिकारी त्याच्यावर रिकव्हरी टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होते. टार्गेट पूर्ण न केल्यास पगार कापण्याची धमकी देत होते. या सगळ्याला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
नवाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील गुमनावारा पिछोर येथे राहणारा ४२ वर्षीय तरुण सक्सेना एका फायनान्स कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. वडील मेडिकल कॉलेजचे रिटायर्ड क्लार्क आहेत. आज सकाळी मोलकरीण घरी कामासाठी आली असता तिने तरुणला एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. पत्नी आणि मुलं दुसऱ्या खोलीत होती.मोलकरणीने आरडाओरडा करून घरच्यांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांनी खोलीतील दृश्य पाहिल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला. पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मृत व्यक्तीजवळ ५ पानी सुसाईड नोट आणि लॅपटॉप सापडला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सुसाईड नोटनुसार फायनान्स कंपनीचे अधिकारी रिकव्हरी टार्गेट पूर्ण करण्यासाठी तरुणवर सतत दबाव टाकत होते. टार्गेट पूर्ण न केल्याने ते त्याला धमकावत होते. त्यामुळे तरुण दोन महिने खूप चिंतेत होता. याबाबत त्याने कुटुंबीयांनाही माहिती दिली होती.
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तरुणने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मीटींग केली होती. अशा परिस्थितीत तरुणने गळफास लावून आत्महत्या केल्याने मीटींगदम्यान काय घडलं हा तपासाचा मुद्दा आहे.
तरुणचा भाऊ गौरव सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणवर कामासाठी खूप दबाव टाकला जात होता. जर टार्गेट साध्य झालं नाही तर त्याच्या पगारातून पैसे कापले जातील असं सांगितलं. भोपाळ येथून सकाळी सहा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांनी त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, त्यानंतर तरुणने हे पाऊल उचललं.”्