अकोला दिव्य ऑनलाईन : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ या योजने अंतर्गत लाभ न मिळालेल्या लाभार्थींचा तक्रार निवारण करण्यासाठी जिल्हयातील सात तालुक्यामध्ये दि.२५ ते २७ सप्टेंबर २०२४ असे ३ दिवस रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.राज्याचे महसुल मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री ना. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पात्र/अपात्रतेची कारणे नमुद केलेली असुन दि.१.४.२०१५ ते दि.३१.३.२०१९ पर्यतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीककर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन केलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत ज्या शेतक-यांकडील दि १.४.२०१५ ते दि.३१.३.२०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यामध्ये अल्पमुदत पीक कर्जाची दि.३०.९.२०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम २ लाखापर्यत आहे, अशा शेतक-यांचे अल्प अत्यल्प भुधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. अशी पात्रता निश्चित केली आहे.
अकोला जिल्हयातील सात तालुक्यामध्ये उक्त योजनेच्या लाभ न मिळालेल्या लाभार्थींनी या शिबिरात हजर होऊन, आपल्या तक्रारीचे निवारण करुन उपरोक्त योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. प्रविण एच लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांनी केले आहे.