अकोला दिव्य ऑनलाईन : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशी साद आबालवृद्धांसहबाळ गोपाळांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. शहरातील खोलेश्वर गणेश घाट, निमवाडी, हरिहर पेठ आणि हिंगणा रोड गणेश घाटांवर हजारो घरगुती गणेश मूर्तींचे जड अंतकरणाने भाविकांनी विसर्जन केले.
गणेश विसर्जनाचा दुपारी बारा वाजेपर्यंतच मुहूर्त असल्याने काल मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पासून नागरिकांची गणेश विसर्जनासाठी लगबग सुरू होती. कोणी डोक्यावर तर कोणी दुचाकीवरून तर काही भाविक हाथगाडीवर गणेशाची मूर्ती आणून बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना दिसत होते. काही चिमुकले तर लाडक्या बाप्पाची मूर्ती हातातून सोडायला सुद्धा तयार नव्हते. सतत दहा दिवस गणपती बाप्पाची सेवा करून आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बालगोपालांसह मोठ्या थोरांचेही अंतकरण जड होत असल्याचे दिसून आले.
अकोला शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा सांगता मिरवणुकीला मंगळवारी जुने शहरातील जय हिंद चौक येथून प्रारंभ झाला. यावेळी पहिला मान असलेले बाराभाई गणपतीची पुजा अर्चा करून मिरवणूकीला आरंभ करण्यात आला. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, गणमान्य व प्रतिष्ठित नागरिकांसह हजारो गणेश भक्त व कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्वरुपवर्धिनी ढोल ताशा ध्वज पथक आणि झांज पथकातील वादकांनी गणरायाला पारंपरिक पद्धतीने दिलेली मानवंदना हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक विषयांतर्गत जनजागृती देखावे व झांकीसोबतच मिरवणुकीत ब्रास बँड, ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.
परंपरागत रस्त्यावरुन बाप्पाची मिरवणूक जात असताना गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने ठिकठिकाणी गणरायाला नमन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या वेळेत म्हणजे सायंकाळी ६ च्या सुमारास मोर्णा नदीपात्रावर मानाचा बाराभाई गणपतीच्या रथाचे आगमन होऊन सांकेतिक मुर्ती विसर्जन केले गेले.
हा क्षण डोळयात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली. तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात रात्री उशिरापर्यंत गणेश घाटासोबत शहरातील विविध भागात निर्माण करण्यात आलेल्या येथे हौदात मूर्तीचे विसर्जन करुन गणरायाला निरोप देण्यात आला.