अकोला दिव्य ऑनलाईन : बहुचर्चित राम प्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणात अकोला स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर येथून काल रात्री आरोपीला अटक करून गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त केली आहे. आरोपीचे नाव पवन विठ्ठल कुंभलकर असल्याची माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अकोला दिव्य मध्ये या काल शनिवार १४ सप्टेंबरला चौकशी संदर्भात वृत्त प्रकाशित केले आणि स्थानिक गुन्हे शाखेने रात्री आरोपीला ताब्यात घेतले. हे येथे विशेष उल्लेखनीय आहे. भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रामप्रकाश मिश्रा (५५) हे 30 ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अकोला येथील गोरक्षण रोड वरील माधव नगरातील राहते घरासमोर वाहनातुन उतरत असतांना मोटार सायकलवर आलेल्या दोन इसमांनी येवून धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करून, घटनास्थळावरून पळून गेले होते.
जखमी राम प्रकाश मिश्रा यांनी अकोला येथील खदान पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला संदर्भात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन खदान येथे अपराध नं 628/24 कलम 109, 3 (5) भारतीय. न्याय. संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.या गुन्ह्यात आरोपी अज्ञात असल्याने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानीक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांना सुचना दिल्या. त्या अनुषंगाने शेळके यांनी सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्या नेतृत्वात पथक गठीत करून गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्यात.
तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनेच्या वेळी उपलब्ध असलेले सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा व गोपनीय माहितीचा वापर करून, राम प्रकाश मिश्रा यांचे वर हल्ला करणारा पवन विठ्ठल कुंभलकर (वय 31) रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क्रमांक 2 कनान जिल्हा नागपूर याने त्याचे साथीदारांसह गुन्हा केल्याचे निष्पन्न केले, आरोपी पवन विठ्ठल कुंभलकर याला सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीस या गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली एक काळ्या रंगाची बजाज पल्सर गाडी (विना नंबरची) पोलिसांनी ताब्यात घेतली. आरोपीस पोलीस स्टेशन खदान येथे पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे यावेळी बच्चन सिंह यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या पवन कुंभलकर याचा वर नागपूर पोलिसात भारतीय दंड विधान अन्वये 302 चा गुन्हा दाखल आहे. मिश्रा हल्ला प्रकरणात हा आरोपी वॉन्टेड असताना तो काही दिवस दिल्लीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये आणखी तीन आरोपी सामील असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणांमध्ये हल्ला करण्यामागील नेमका उद्देश काय, हा हल्ला कोणी केला किंवा करवीला याबाबत अद्याप आरोपींकडून माहिती मिळाली नाही. हल्ला आर्थिक व्यवहारातून अथवा राजकीय पार्श्वभूमीवर झाला. याबाबत निश्चित माहिती अद्यापही आरोपींकडून मिळाली नाही. लवकरच हल्ला का आणि कशासाठी कऱण्यात आला, याबाबत उलगडा होईल,असे बच्चन सिंह यांनी यावेळी सांगितले.