अकोला दिव्य ऑनलाईन : गुटखाबंदी असताना अकोला शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर दणाणून कारवाई करण्यात धन्यता मानत असलेल्या अकोला पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या नाकावर टिच्चून अकोला शहरात कायद्यानुसार बंदी असलेल्या गुंगीकारक औषधी (बटन गोळ्या) तसेच गर्भपात आणि शारीरिक ताकद वाढविणाऱ्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री होत असल्याचे, जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरात येऊन केलेल्या कारवाईमुळे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी अकोला येथील सागर आठवले याला जालना एलसीबी पथकाने ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत, अमरावती येथील कपील साहू या व्यक्तीचे नाव पुढे आले. तेव्हा त्यांच्याकडून ८७ हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला, अमरावती येथून दोघांना ताब्यात घेतल्याने अकोला पोलिस व एलसीबीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. तरुण पिढीला नशेच्या गोळ्यांची सवय लाऊन कमाई करणारे केवळ हे दोघेच नसावे तर अकोला अमरावती जिल्ह्यात मोठी टोळीच सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कायद्यानुसार बंदी असलेल्या गुंगीकारक औषधी (बटन गोळ्या) विक्री होत असल्याचे माहितीवरून जालना स्थानिक गुन्हे शाखेने जालना येथील मेडिकल चालक संतोष बालासाहेब जाधव, राहुल भागाजी गायकवाड या दोघांसह उद्धव पिराजी पिटारे, अल्तमश उर्फ अलमश शेख (सर्व रा. जालना) या चौघांना ताब्यात घेतले होते.
पर्दाफाश केला. याकारवाईत बटन गोळ्यांसह गर्भपात आणि शारीरिक ताकद वाढविणाऱ्या गोळ्यांचा ८ लाख १८ हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर अकोला येथील सागर आठवले याचे नाव समोर आले होते. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार राजेंद्र वाघ, अंमलदार जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कैलास खार्डे, इरशाद पटेल, किशोर पुंगळे, सतीश श्रीवास यांच्या पथकाने अकोला येथून आठवलेला ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अटकेतील आठवले कडे केलेल्या चौकशीनंतर वैद्यकीय व्यवसायात नसतानाही अमरावती येथील कपील साहू हा गर्भपाताच्या गोळ्या अवैधरीत्या विक्री करीत असल्याचे समजले . फौजदार वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी साहू याला १० सप्टेंबर रोजी अमरावती येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले, त्याच्याकडे ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जालना पोलिस व एलसीबीकडून या अवैध धंद्याचा पर्दाफाश करीत बटन गोळ्यांसह गर्भपात आणि शारीरिक ताकद वाढविणाऱ्या गोळ्यांचा ८ लाख १८ हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.