अकोला दिव्य ऑनलाईन : एकीकडे जिल्ह्यात पुराचे थैमान सुरु असल्याने बळीराजा उध्वस्त झाला असताना, हजारो लोक बेघर झाले असताना भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे मात्र कार्यक्रमात नाचताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.आर्णी -केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे हे एका कार्यक्रमात गौतमी पाटीलसोबत थिरकताना दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत गौतमीनेही ठेका धरला.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो लोक विस्थापित झाले आहेत. शेतीचे सर्वात जास्त नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ येते की काय, अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजप आमदार मात्र गौतमी पाटीलसोबत नाचण्याचा मोह आवरू शकले नाही बराच वेळ ते तिच्या बरोबर थिरकले. यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे काल तान्ह्यापोळ्याच्या दिवशी ३ सप्टेंबरला भाजपचे आमदार नामदेव ससाने व माजी जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हे कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. या कार्यक्रमाला आमदार नामदेव ससाने, नितीन भुतडा सह मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते.गौतमी पाटीलचे नृत्य सुरु असताना उपस्थित असलेल्या लोकांनी जोरदार प्रतिसाद तिला दिला. दुसरीकडे मंचावर बसलेले आर्णी मतदार संघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे गौतमी पाटीलचे नृत्य पाहून स्वतःला सावरू शकले नाही आणि स्टेजवर जाऊन तेही तिच्यासोबत थिरकले. सुरवातीला गौतमी पाटील यांनी त्यांना प्रतिसाद दिला. पण, शेवटी त्याही मागे हटल्या.