अकोला दिव्य ऑनलाईन : भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुटके यांचे दिवंगत भावाच्या पत्नीने लेखी तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.एखाद्या आमदारावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी फुके यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (वय ७२), आई रामा फुके (वय ६७), पत्नी डॉ. परिणीता फुके (४१) आणि नितीन फुके (४०) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.प्रिया फुके यांनी अंबाझरी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संकेत फुके हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मात्र, लग्नाच्या वेळी ही बाब लपवून ठेवण्यात आली होती. आमचे कुटुंब सधन असून आम्ही राजकीय दबावाने काहीही करू शकतो. तू शांत राहिलो नाहीस तर तुझ्या आई आणि बहिणीवर अत्याचार करवू , अशी धमकी सासऱ्यांनी दिली,असे तक्रारीत नमूद आहे.
फुके कुटुंबीयांनी तिला आणि संकेतला बाहेर जाण्यास मनाई केली होती. संकेत सप्टेंबर २०२२ मध्ये मरण पावला. काही दिवसांनंतर फुके कुटुंबीयांकडून एटीएम, बँकेचे पासबुक, पासवर्ड रेकॉर्ड, दागिने जबरदस्तीने काढून घेतले. संकेतचे ‘अताशा आशीर्वाद बिल्डर्स’मध्ये ४० टक्के शेअर्स होते. ते परस्पर सासू-सासऱ्यांच्या नावाने करून घेतले. याबाबत नितीन फुके यांना विचारणा केली असता प्रिया यांना शिवीगाळ करण्यात आली.असे तक्रारीत नमुद आहे.
या संदर्भात परिणय फुके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रिया आणि कुटुंबातील घरगुती वादातून ही घटना घडल्याचे सांगितले. माझा भाऊ गेल्यापासून भांडण सुरू झाले. मी दुसऱ्या ठिकाणी राहतो आणि वाद मिटवण्याचा मी खूप प्रयत्न केला. माझ्या आई-वडिलांनी तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
मी दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझ्या पत्नीने मध्यस्थी करून सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तडजोड यशस्वी झाली नाही, याची मला खंत आहे. पालकांनी जुलैमध्ये आणखी एक तक्रार दाखल केली आहे. हा वाद आम्ही सोडवू. मात्र, एफआयआरमध्ये माझे नाव आल्याने मला धक्का बसला आहे, असे परिणय फुके यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.