अकोला दिव्य ऑनलाईन : प्रेमप्रकरणाचे बिंग फुटण्याच्या भीतीने एका प्रेमविराने आपल्या सहा ते सात मित्राच्या मदतीने भरदिवसा एका युवकाची हत्या केल्याने वाशिम शहरात खळबळ उडाली. ही घटना शहर पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या एका हॉस्पिटल परिसरात घडली. राहूल हिंमतराव वाघ (२९) असे मृत युवकाचे नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरा गायकवाड येथील राहूल वाघ हा वाशीम तालुक्यातील काटा येथे गत दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. वाशीम येथील एका खासगी रुग्णालयात राहुल वाघ कामाला होता. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास काही युवकांनी त्याचा पाठलाग करीत शहर पोलीस स्टेशन जवळील एका हॉस्पिटल जवळ त्याचेवर धारदार शस्त्राने वार केले. त्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी युध्दपातळीवर आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलिसांनी दोन संशयीताना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पुर्ण होऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेमागील कारण …
राहुल हा वाशिम शहरातील खासगी रूग्णालयात कंपाउंडर म्हणुन काम करत होता. राहुलच्या परिचित असलेली एक युवती तीच्या मित्रासोबत त्याच्या नजरेस पडली होती. या प्रेमप्रकरणाचे बिंग फुटू शकते, अशी भिती नेहमीच त्या प्रेमी जोडप्याला सतावत होती. प्रेमाचा बिंग फुटू नये म्हणुनच अडसर असलेल्या राहुलचा अखेर काल काटा काढला.अशी चर्चा परिसरात पसरली आहे.