अकोला दिव्य ऑनलाईन : महिला सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशभर या घटनेचे पडसाद उमटले. यादरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते मुर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांनी वादग्रस्त वक्तव्य अमरावतीत केले आहे. सरकारने महिलांना स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्वर हाताळण्याची परवानगी द्यावी, मी त्यांना रिव्हॉल्व्हर घेऊन देतो, असे वक्तव्य केले आहे.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात अमरावतीत रविवारी नेहरू मैदान ते इर्विन चौक या दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या समारोपप्रसंगी बोलताना नानकराम नेभनानी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.नानकराम नेभनानी म्हणाले, बांगलादेशात हिंदू समाजासोबत जे काही घडत आहे ते आपण पाहत आहोत. पंतप्रधान मोदी हे एक कर्मठ माणूस आहेत आणि याविरोधात ते काहीतरी कारवाई करतील, असा आम्हाला विश्वास आहे. राज्यातही ज्या काही घटना घडल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याची दखल घेतली आहे. यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो, की त्यांनी महिलांना रिव्हॉल्वर वापरण्याची परवानगी द्यावी. विशेषकरुन त्यांनी जर ही परवानगी दिली तर अमरावतीत मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे रिव्हॉल्वहर घेऊन देईन. महिलांनी स्वसंरक्षणासाठी आता रिव्हॉल्वर वापरावी. यात दोन-चार चांगली माणसे मेली तरी हरकत नाही. पण वाईट लोक आता वाचले नाही पाहिजेत. याची जबाबदारी घेऊन, कोर्टाचा खर्चही करायला मी तयार आहे.
नानकराम नेभनानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटचे मानले जातात. ते शिवसेना शिंदे गटाचे मुख्य समन्वयक तसेच शिवसेना प्रणित सिंधी समाज राज्य संघटक आहेत. जिल्हा नियोजन समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. मोर्चाच्या समारोपप्रसंगी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनीही महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आता कठोर भूमिका घ्यायला हवी, अशी भूमिका मांडली. महिलांनी आता लढायला शिकले पाहिजे. कुणी अत्याचार करीत असेल, मरायचे आहेच, तर अत्याचार करणाऱ्याला मारूनच मरू, असा विचार करून प्रतिकार केला पाहिजे, असे डॉ. बोंडे म्हणाले.