अकोला दिव्य ऑनलाईन : सर्वांचे आराध्य दैवत व सकल कलांची देवता श्री गणेश यांची दरवर्षी गणेशोत्सवात घरोघरी स्थापन केल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती पर्यावरण पूरक असाव्यात. तसेच गणेश विसर्जनाच्या वेळी होणारे जल प्रदूषण टाळता यावे या उद्देशातून शाडू माती पासून गणेश मूर्ती निर्मितीची स्पर्धा आज शनिवार 24 ऑगस्ट रोजी जठारपेठ येथील स्व. सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 400 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल 14 सप्टेंबर रोजी सकाळी बाल शिवाजी शाळेत घोषित केला जाणार आहे.
येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने नंद गणपती संग्रहालय चिखलदरा, ब्राह्मण सभा अकोला आणि ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू माती पासून गणपती मूर्ती बनविण्याची ही स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्यासह उपजत असलेल्या अभिनव कल्पनांना या स्पर्धेमुळे वाव मिळाला. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मूर्ती या नंद गणपती संग्रहालय मोथा चिखलदरा येथे ठेवण्यात येणार आहेत. असे संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. माधव देशमुख यांनी सांगितले.
वर्ग पाच ते सात, वर्ग आठ ते दहा व त्यापुढील अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटासाठी प्रथम बक्षीस 5000, द्वितीय 3000 व तृतीय 2000 असे निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सुवर्णा सुनील कुमार नागपुरे व शरद कोकाटे यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेला प्रदीप नंद, दिपाली नंद, अविनाश देव, संगीता जळमकर, कीर्ती चोपडे, रागिनी बक्षी, वैशाली पाटील, कीरण मुरूमकर, निलेश देव, निशिकांत बडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
येत्या 14 सप्टेंबरला सकाळी साडेआठ वाजता या स्पर्धेचा निकाल घोषित करून बक्षीस वितरण केले जाणार आहे. अशी माहिती ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी दिली.