अकोला दिव्य ऑनलाईन : पोळा केवळ सण नसून वृषभ राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा उत्सव आहे. गत 23 वर्षापासून पारंपारिक पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या पोळा उत्सवाला एक वेगळं स्वरूप देत, अनिल मालगे यांनी शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा घेण्यात येते. माजी आमदार प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या उपक्रमात यंदाही शेतकरी सन्मान आणि उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा जुने शहरातील पोळा चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाही सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येतो. शहरातील वरिष्ठ पत्रकार बांधवांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ आणि प्रोत्साहनपर असे सहा बक्षिसे देण्यात येणार आहे. सोहळ्यात सहभागी बैलजोड्यांचं निरीक्षण करून, क्रमवार निवड करण्यात येते .यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित येईल.
यासोहळ्याचे वैशिष्ट्य की, अकोल्यासह पंढरपूर, मराठवाडा, सोलापूर आदी भागातून शेतकरी आपल्या बैलजोड्या आणून, त्यांना सजवून सहभागी होतात. दरवर्षी विविध मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती लाभली आहे. मागच्या वर्षी महाभारतात बलरामाची भूमिका साकारणारे सिने अभिनेता सागर सोळंके आकर्षणाचे केंद्र होते. यावर्षी सुध्दा उत्साहाने व जल्लोषात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.असे आयोजक व संत गाडगेबाबा संस्थेचे अध्यक्ष अनिल मालगे व मित्र परिवाराने कळविले आहे.