Friday, December 27, 2024
Homeगुन्हेगारीमालेगावात ९ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग ; आरोपी फरार: पालकांमध्ये चिंतेचे...

मालेगावात ९ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग ; आरोपी फरार: पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

अकोला दिव्य ऑनलाईन: राज्यात एका मागे एक विद्यार्थिनींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होतो. आता वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथूनही नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली. शाळेसमोरच आरोपी तरुणाने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बदलापूर येथे चिमुकल्या मुलींच्या अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त झाला. अकोला जिल्ह्यात सुद्धा नराधम शिक्षकाने आठवीतील सहा मुलींना अश्लिल चित्रफित दाखवून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर आता वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे शाळेसमोरच नवव्या वर्गातील विद्यार्थिनीचा तरुणाने हात पकडून विनयभंग केला. पीडितेच्या आई वडिलांचे बालपणीच निधन झाल्याने ती काका-काकूबरोबर राहते. एका गावावरून ती मालेगाव येथे शिक्षणासाठी येते. गावातीलच आरोपी गणेश नंदू कांबळे हा पीडित मुलीचा शाळेत जात असताना नेहमी पाठलाग करीत होता. २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आरोपीने शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पीडितेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. स्वतः बरोबर नेण्याचा तगादा आरोपीने पीडितेला केला. पीडितेने आरोपीच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतली. शाळेमध्ये जाऊन घडलेला प्रकार वर्ग शिक्षकाला सांगितला. वर्ग शिक्षक बाहेर आलेले पाहून आरोपी पसार झाला.‌

पीडिता घरी आल्यावर तिने आपल्या काकांना घटनेची माहिती दिली. पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी काकांसह पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मालेगाव पोलीस ठाण्यात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या १२ व ८ सोबत भारतीय न्यायसंहितेच्या (बीएनएस) ३५१ (२), ३५१(३), ७४, ७८ कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या अगोदर देखील आरोपीने पीडितेला वारंवार त्रास दिल्याच्या घटना घडल्या आहेत. सन २०२३ मध्ये पीडितेने त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपीला गजाआड केले होते. कारागृहातून सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा पीडितेचा त्रास देणे सुरू केले. २० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता वर्गातील मैत्रिणींसोबत पीडिता मैदानावर गेली असता त्याठिकाणी देखील आरोपीने पाठलाग केला होतो. शाळेतील वर्गशिक्षकांनी आरोपीला समज देऊन देखील त्याचात सुधारणा झाली नाही. आता आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!