अकोला दिव्य ऑनलाईन : अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत असताना यानिमित्त २२ जानेवारीपासून दर महिन्याच्या 22 तारखेला त्या सोहळ्याचे स्मरण आणि प्रभु श्रीरामाच्या नावाचा जयघोष कायम ठेवण्यासाठी सुंदरकांडचे आयोजन करण्यात येत आहे. बिर्ला राम मंदिर येथे दर महिन्याला 22 तारखेला 13 तास अखंड सुंदरकांड आयोजित करण्यात येते. ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या या आयोजनास दर महिन्याला भाविकांचा प्रतिसाद वाढत आहे.
राधेकृष्ण सुंदरकांड भजनी मंडळ, कैलास टेकडी सुंदरकांड व भजनी मंडळ, तपे हनुमान मंडल, लक्ष्मण सुंदरकांड मंडळ या भजनी मंडळांच्या सहकार्याने सुंदरकांड आयोजन ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाद्वारे करण्यात आले आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळी बिर्ला राममंदिरात 5 हजार मातृशक्ती बरोबर शाळकरी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एक लक्ष रामरक्षा पठण सोहळ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रतिसादानंतर मागील 4 महिन्यात अकोलेकरांचा सुंदरकांड पठनास उत्सुर्त प्रतिसाद आहे. रामभक्तीचा अनोखा सोहळा स्मरणीय ठेवण्यासाठी आणि रामभक्तांनी केलेल्या आग्रहाखातर हे सुंदरकांड दर महिन्यात आयोजित केल्याची माहिती निलेश देव यांनी दिली आहे. या सुंदरकांडसाठी शहरातील नामांकित 21 सुंदरकांड भजनी मंडळी उपस्थित होतात. उद्या गुरुवार 22 ऑगस्टला सकाळी 7 वाजता सुंदरकांड सुरु होऊन महाआरती संध्याकाळी 6.45 होईल. अशी माहिती निलेश देव यांनी दिली आहे.
रामभक्तांनी या सुंदरकांड आयोजनात सहभागी होत रामनाम स्मरण व उच्चारणात सहभाग नोंदवावा. असे आवाहन त्यांनी केले आहे. जगात कुठेही नाही असा नवा विक्रम आणि आयोजन बिर्ला राम मंदिरात होतं आहे.