गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : डिसेंबर २०१२ मधे दिल्लीत निर्भया प्रकरण झालं. या घटनेनंतर सर्वच समाजात महिला व बालकांबाबतच्या लैंगिक हिंसेविषयी जरा मोकळेपणानं बोलायला व स्वीकारायला लागला. योगायोगानं या घटनेच्या महिनाभर आधीच, १४ नोव्हेंबर २०१२ रोजी ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२’ (पोक्सो) अमलात आला होता. याचा एकत्रित परिणाम म्हणून लैंगिक शोषणापासून बालकांच्या सुरक्षिततेचा गांभिर्यानं विचार सुरू झाला. बालक व पालकांसाठी ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर समाजात व शाळा पातळीवर जागृती सत्रं सुरू झालीत. समाज, शिक्षक व पालक या मुद्द्यावर किमान विचार करायला लागले; पण आज १० वर्षात फार गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघितलं जातं नसल्याचे, सखेद नमूद करावेसे वाटते. दरदिवशी लैंगिक शोषणाच्या व लैंगिक हिंसेच्या घटना वाढत असून बदलापूर येथील रेल्वे ट्रॅकवर केलेले आंदोलनाला आक्रोशाची सुरुवात म्हटले तर…
लैंगिक हिंसा, लैंगिक शोषणाबद्दल चारचौघांत काय; पण अगदी खासगीतही बोलायचं नाही, इतका हा विषय ‘निषिद्ध’ मानला गेला आहे.पालकांच्या जाणीवजागृती सत्रांमध्ये या विषयाची चर्चा होते, तेव्हा महिला व पुरुष पालकही सांगतात, की घरात अथवा घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हिंसेचे अनुभव आले, तरी त्याबद्दल बोलायला जागाच नाही. घरातले अनुभव घराबाहेर सांगता येत नाहीत आणि घराबाहेर आलेले अनुभव सांगायला, स्वीकारायला घरात तेवढं मोकळं वातावरण नाही. या प्रश्नाबाबत सगळ्यांच वयोगटात घुसमट आहे.हे कटू असले तरी सत्य आहे.
सर्व समाजात, जातींत, वर्णात, वर्गात बालकांवर लैंगिक अत्याचार होतात. तान्हं बाळ ते कुमारवयीन बालकं लैंगिक अत्याचारांना बळी पडतात. ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे; पण त्याकडं सोयीनं वैयक्तिक प्रश्न म्हणून पाहिलं जातं. पाल्य ही पालकांची मालमत्ता समजली जात असल्यानं, त्यावर कृती करणं त्यांचीच जबाबदारी आहे, आपली काहीच भूमिका नाही, अशी समाजाची असलेली मानसिकता या घटनांमध्ये वाढ करण्यात हातभार लावत आहे.हे कटू पण सत्य आहे.
बालकं सगळ्यांत जास्त कुठं सुरक्षित असू शकतात, या प्रश्नाचं वास्तववादी उत्तर हेच आहे की, जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात नाहीत. अगदी तिसरी-चौथीतल्या, शहरी-ग्रामीण भागांतील बालकांनी दिलेल्या उत्तरांचा हाच गाभा आहे. बाल लैंगिक शोषण करणाऱ्यांमध्ये कुणीही असू शकतं. बालक रोज संपर्कात येतं अशी व्यक्ती, वयानं मोठे मित्र, शिक्षक, व्हॅन/रिक्षा चालक, भावाचे मित्र, शेजारी, काका-मामा, जवळच्या नात्यातील भाऊ, सावत्र वडील, कधी आजोबा व वडीलही यात असतात. स्त्रियाही काही प्रमाणात लैंगिक शोषण करताना आढळतात. ओळखीची, नातेवाइक स्त्री, आईची मैत्रीण, शेजारीण, बालकाचा सांभाळ करणारी महिला असं कुणीही यात असू शकतं. महिलांचं यातील प्रमाण कमी दिसतं; अथवा घटना प्रकाशात येताना दिसत नाहीत. हा भाग वेगळा पण हे मान्य केले पाहिजे.
लैंगिक शोषण कुठंही होऊ शकतं. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यात, जत्रेत, लग्नामध्ये, शौचालयात, मैदानावर, मॉलमध्ये, सिनेमा थिएटर, बस-रेल्वेप्रवासात, शेतात, जंगलात, डोंगरावर, मोकळ्या माळावर, बंद घरात, खोलीत, शाळेत, क्लासमध्ये, शेजारच्या, नातेवाइकांच्या घरी. अगदी स्वत:च्या घरीही बालकं सुरक्षित नाहीत, हे भीषण सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. लैंगिक शोषण करणारी व्यक्ती वेगळी ओळखू येत नाही; कारण ती आपल्यातलीच, आजूबाजूला वावरणारी, विश्वासातली असते; त्यामुळं असं काही घडत असेल, अशी शंकाही मनाला शिवत नाही. या ओळखीच्या, जवळच्या नात्यातल्या व्यक्ती बालकांच्या विश्वासाचा, अज्ञानाचा गैरफायदा घेतात.
अगदी बालपणात चॉकलेट, खेळण्यांचं आमिष दाखवून, आईची शपथ घालत गुपिताच्या नावाखाली लैंगिक शोषण केलं जातं. कळत्या वयातल्या (वय आठ ते १२) मुला-मुलींना पालकांनी नकार दिलेल्या गोष्टीचं आमिष दाखवून व विरोध केल्यानंतर पालकांसमोर उघडं पाडायची, लहान भावंडांना इजा करायची धमकी देऊन लैंगिक शोषण सुरू राहतं. कुमारवयातील बालकांची ‘वयात येण्याची’ प्रक्रिया सुरू असते. शरीरात व मनात संप्रेरकांमुळं होणारे बदल, वाटणारं भिन्नलिंगी आकर्षण यांचा गैरफायदा घेत चुचकारून, प्रेम असल्याचं दाखवत, तर कधी धाकानं शरीरसंबंधांची सवय लावली जाते. विरोध करायचा प्रयत्न केला, तर लहान भावंडांचं शोषण करण्याची धमकी अथवा घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते.
१८ वर्षांच्या आतील बालकासाठी समोरच्या व्यक्तीचं वर्तन अथवा स्पर्श नकोसा वाटतो, तेव्हा तो असुरक्षित, भीती, किळसवाणा अनुभव मन व शरीरावर हिंसा करणारा असतो. या अनुभवांना एकदा अथवा वारंवार सामोरं जावं लागतं, तेव्हा ते लैंगिक हिंसा अथवा लैंगिक शोषण असतं. कधी प्रत्यक्ष भावनिक, शारीरिक अत्याचार आणि हिंसा असते, कधी गोड बोलून, विश्वास निर्माण करून, विविध आमिषं दाखवून, प्रेमाच्या नावाखाली लैंगिक शोषण केलं जातं.ते वारंवार अथवा बराच काळ घडत असतं.अत्याचार करणारी व्यक्ती एकानंतर दुसरा, अथवा एकाच वेळेस अनेक बालकांचं शोषण करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाल लैंगिक शोषण या प्रश्नाचा विचार करताना, सजगतेच्या भिंगातून जाणीवपूर्वक बघायची गरज आहे. ‘बालकांचं लैंगिक शोषण’ हे त्यांच्या ‘संरक्षण हक्कांचं’ उल्लंघन आहे. बाल लैंगिक शोषणाच्या प्रश्नाकडं बघताना समाजाचा आणि सरकारी यंत्रणांचा दृष्टिकोन ‘बालककेंद्रित’ असला पाहिजे. बालकांची सुरक्षितता हे सगळ्यांचंच प्राधान्य असायला हवं. मुलांच्या हक्कांची जाणीव ठेवून, त्यांना सुरक्षितता व सुरक्षित वातावरण देणं, ही जबाबदार नागरिक म्हणून आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे ना !