Monday, September 16, 2024
Homeराजकारणतोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही !

तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही !

अकोला दिव्य ऑनलाईन : चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा ‘घरचा आहेर’ महायुतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला होता. मुंबई गोवा हायवेचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना कदमांनी चव्हाणांवर निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाणांनी त्यांना अडाणी संबोधलं आहे. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच चव्हाणांनी दिला.

रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

राष्ट्रीय महामार्ग हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अंतर्गत येतात. त्यामुळे रामदास कदम अडाणी माणूस आहेत, हे माझं मत आहे. रामदास कदम यांच्या बाजूला बसणारे व टाळ्या वाजवणारे त्याच पद्धतीचे असतील.
मला त्यांच्यावर टीका करायला आवडत नाही मात्र त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.

त्यांच्या मुलाला हजारो कोटी रुपये निधी दिला, त्यामुळे त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. ते पंधरा वर्षे मंत्री होते, तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते, त्यांनी काय उपटलं? मला बोलायला खूप काही येतं, कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं, त्या वेळेला कोणी वाचवायला राहणार नाही, असा इशाराच रवींद्र चव्हाण यांनी दिला.युतीधर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही, की कोणीही काहीही बोलले आणि आम्ही ऐकून घेऊ, असं होणार नाही हे लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिल्याने महायुतीत फटाके फुटताना दिसत आहेत.

ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी उद्धव ठाकरेंपासून ते भाजप नेत्यांपर्यंत अनेकांचा त्यांनी समाचार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. त्यामुळे महायुतीमधील दोन घटकपक्षांत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!