अकोला दिव्य ऑनलाईन : अखिल भारतीय मारवाडी सम्मेलनाची दोन दिवसाची राष्ट्रीय कार्यकारणीची बेंगलोर येथे मारवाडी सम्मेलन कर्नाटक प्रकोष्ठतर्फे आयोजित सभेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेत महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी सम्मेलनाचे प्रदेश पदाधिकारी सहभागी झाले होते. यात मारवाडी सम्मेलनाचे माजी प्रदेश अध्यक्ष व माजी मंत्री रमेशचंद्र बंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निकेश गुप्ता, राष्ट्रीय संघटन मंत्री वीरेंद्र धोका तथा प्रदेश महामंत्री सुदेश करवासह इतर पदाधिकारी सहभागी झाली होते.
राष्ट्रीय अध्यक्ष शिवप्रकाश लोहिया यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या संमेलनात विविध उपक्रमाची माहिती राष्ट्रीय मंत्री कैलासचंद्र तोदी यांनी दिली. उपस्थितांचे स्वागत कर्नाटक प्रकोष्ठचे अध्यक्ष सीताराम अग्रवाल यांनी केले. या सभेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे कार्य विवरण सादर करण्यात आले. संमेलनाच्या संविधान संशोधनवर विस्तृत चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आगामी काळात रोजगार व व्यापार शाखेचा विस्तार व समाजाला गतिमान व सशक्त करण्याचे मुख्य कार्य संमेलनाच्या वतीने लवकरच हातात घेण्यात येणार तसेच राष्ट्रीय स्तरावर सर्व ठिकाणी शाखा विस्तार व सदस्य संख्या वाढवावी यासाठी आश्वासक करण्यात आले. प्रदेशचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.