Wednesday, January 15, 2025
Homeराजकारणमहायुतीत बाळापूर शिवसेनेकडेच ! इतर घटक पक्षांची दावेदारी तथ्यहीन

महायुतीत बाळापूर शिवसेनेकडेच ! इतर घटक पक्षांची दावेदारी तथ्यहीन

अकोला दिव्य ऑनलाईन : महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ परंपरागत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आहे. महायुतीतील घटक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला याची कल्पना आहे. त्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून दावेदारी केली जात असली तरी वरिष्ठांकडून ती मान्य होणार नाही. शिवसेनेच्या नेतृत्वाकडून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची चाचपणी केली जात आहे. एवढं निश्चित की, सक्षम उमेदवार निवडणूक लढेल, अशी माहिती शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. २०१९ मध्ये शिवसेना व भाजप युतीमध्ये बाळापूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. शिवसेनेने बाळापूरमध्ये विजय मिळवला. त्यामुळे आताही हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडेच राहील, असा विश्वास पवळ यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते व मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत चर्चा राज्य समन्वयक पवळ

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दावेदारी केली जात असली तरी त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. बाळापूर मतदारसंघ शिवसेनेकडेच कायम राहणार आहे. या मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याची पक्षाकडून तयारी सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापूरवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. जातीय समीकरणांतही बाळापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी पोषक ठरतो. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम करून महायुतीला विजयी करतील, असे पवळ म्हणाले.
पक्षाकडून अद्याप कुणालाही अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली नाही. लवकरच उमेदवार निश्चित करून पक्ष बाळापूर मतदारसंघात अधिक जोमाने कामाला लागेल. बाळापूर मतदारसंघातील जनता खऱ्या शिवसेनेसोबत दिसेल. बाळापूर मतदारसंघात एससी, एसटी व मुस्लीम मतदारांची मोठी संख्या मोठी आहे. ओबीसी, मराठा, माळी समाजाचे मतदारही अधिक संख्येत आहे. ८० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण विकासावर शिवसेनेचा भर राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार निश्चितच शिवसेनेला बळ देतील, असेही पवळ यांनी सांगितले.

महायुतीचा जनाधार वाढला – राज्य समन्वयक पवळ

बाळापूर मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत ६५.८९ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी ३५.६८ टक्के मतदान हे शिवसेना व भाजप युतीच्या उमेदवारांना पडल्याने ते विजयी झाले. याशिवाय आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला देखील ८.४४ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे २०१९ चा विचार केल्यास आता ४३.९२ टक्के मतांसह शिवसेनेचा जनाधार मजबूत आहे. आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हायला हवे. यासाठी शिवसेना व्यापक मोहीम राबविणार असल्याचेही रामेश्वर पवळ यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!